एकाच मंडपातील 2 लग्नात नवरदेव नवरीची अदलाबदली, लाईट आल्यावर 'शॉर्टसर्किटसमोर'

एकाच मंडपातील 2 लग्नाचं 'क्रॉसकनेक्शन' ...लग्नात बत्तीगुल, अंधारात माळ टाकताना नवरदेव नवरींचं क्रॉस कनेक्शन, लाईट आल्यावर 'शॉर्टसर्किट'आलं समोर आणि त्यानंतर...  

Updated: May 10, 2022, 06:16 PM IST
एकाच मंडपातील 2 लग्नात नवरदेव नवरीची अदलाबदली, लाईट आल्यावर 'शॉर्टसर्किटसमोर'

उज्जैन : मध्य प्रदेशातील उज्जैन जिल्ह्यात घडलेल्या एका घटनेने सगळेच हैराण झाले आहेत. दोन सख्ख्या बहिणींचा विवाह सोहळा एकाच मांडवात सुरु होता. मंडप सजला होता, अनेक पाहुणे उपस्थित होते. सर्वत्र उत्साहाचं वातावरण होतं. पण थाटामाटात सुरु असलेल्या विवाह सोहळ्यात मोठा घोळ झाला आणि सर्वत्र एकच चर्चा रंगली.

विवाह सोहळ्यात नेमकं झालं काय?
उज्जैन जिल्ह्यातल्या दंगवाडा गावात राहणाऱ्या रमेशलाल यांच्या दोन मुली आणि एका मुलाचा विवाह एकाच मांडवात सुरु होता. यापैकी निकिता आणि करिश्मा या दोन मुलींचा विवाह दंतेवाड्यातील रामेश्वर आणि गणेश या दोन मुलांशी ठरला होता. दोनही तरुण वेगवेगळ्या कुटुंबातले आहेत. रामेश्वरचं लग्न करिश्मासोबत तर गणेशचं लग्न निकितासोबत ठरलं होतं.

लग्नाचा विधी सुरु झाला
लग्नाचा विधी सुरु झाला, सप्तपदीची वेळ आली आणि नेमकी त्याचवेळी परिसरातील वीज गेली. आणि इथेच घोळ झाला. अंधारामुळे गोंधळ झाला आणि गोंधळातच वधूंची अदलाबदल झाली. दोनही वधूंनी डोक्यावरुन पदर घेतला असल्याने ओळखणं कठिण झालं. गोंधळातच निकिताने रामेश्वरबरोबर तर करिश्माने गणेशबरोबर सप्तपदी घेतली. 

अंधारातच लग्नाच्या विधी पार पडला. दोनही नवरदेवांनी वेगवेगळ्या वधूंचा हात धरून पूजा केली. पण रात्री जेव्हा वीज आली तेव्हा समोरचा प्रकार पाहून सर्वांनाच धक्का बसला. वीज आली त्यावेळी निकिताच्या हातात रामेश्वरच्या आणि करिश्माच्या हातात गणेशचा हात होता. 

झालेल्या प्रकारामुळे वादाची परिस्थिती निर्माण झाली. दोन्ही कुटुंबात वाद झाला, पण अखेर ग्रामस्थांच्या मध्यस्थीने तोडगा काढण्याचं ठरवण्यात आलं. दोनही मुलींशी बोलून पुन्हा लग्नाचे विधी करण्यात आले, आणि मुलींचं लग्न ठरलेल्या मुलाशी लावून देण्यात आलं. 

वीज खंडीत झाल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं. गावात दररोज कित्येक तास वीज जाते, त्याचा खूप त्रास सहन करावा लागतो अशी तक्रार ग्रामस्थांनी केली.