राहुल गांधी यांची खासदारकी रद्द होताच काँग्रेस मुख्यालयावरही कारवाई; जेसीबीने तोडल्या पायऱ्या

Rahul Gandhi : सूरत हायकोर्टाने मानहानीच्या खटल्यामध्ये राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर लोकसभा सचिवालायाने दुसऱ्याच दिवशी त्यांची खासदारकी रद्द केली आहे. यावरुन काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे

Updated: Mar 25, 2023, 05:52 PM IST
राहुल गांधी यांची खासदारकी रद्द होताच काँग्रेस मुख्यालयावरही कारवाई; जेसीबीने तोडल्या पायऱ्या title=
(फोटो सौजन्य - ANI)

Rahul Gandhi Disqualified : मानहानीच्या खटल्यामध्ये सूरत हायकोर्टाने (Surat High Court) काँग्रेसचे (Congress) माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. हायकोर्टाने शिक्षा सुनावताच राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाली आहे. लोकसभा (Lok Sabha) सचिवालयाने हायकोर्टाच्या निर्णयानंतर दुसऱ्याच दिवशी अधिसूचना काढून राहुल गांधी यांना अपात्र ठरवले आहे. काँग्रेससह ठाकरे गट, राष्ट्रवादी, तृणमूल काँग्रेस, भारत राष्ट्र समिती आणि आम आदमी पक्षासह इतर विरोधी पक्षांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. यानंतर आता काँग्रेस मुख्यालयावरही (Congress headquarters) बुलडोझर (JCB) चालवण्यात आला आहे.

शुक्रवारी काँग्रेस मुख्यालयावर कारवाई करण्यात आली आहे. दिल्लीतील दीनदयाल उपाध्याय बांधल्या जाणाऱ्या काँग्रेसच्या नवीन कार्यालयावर ही कारवाई करण्यात आली आहे. अतिक्रमण विरोधी मोहिमेअंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागाने (पीडब्ल्यूडी) ही कारवाई केली. काँग्रेसच्या या मुख्यालयात बांधलेल्या तीन पायऱ्या अतिक्रमणामध्ये  येत असल्याने बांधकाम विभागाने बुलडोझरने त्या तोडल्या आहेत.

"ही काही मोठी कारवाई नव्हती आणि  इमारतीच्या बाजूच्या प्रवेशद्वारावर तीन जादा जिने बांधण्यात आले. हे बांधकाम दिल्ली महानगरपालिकेने (एमसीडी) मंजूर केलेल्या बांधकाम आराखड्यानुसार नव्हते. त्यामुळेच 24 मार्च रोजी या पायऱ्या तोडण्यात आल्या," असे पीडब्ल्यूडीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. आमच्या कर्मचाऱ्यांनी 20 मार्च रोजी तपासणी केली. इमारतीच्या अतिरिक्त पायऱ्या काढून टाकण्यासाठी तिथे असलेल्या लोकांना सांगण्यात आले होते. तसे न झाल्याने आम्ही अतिरिक्त पायऱ्यांवर कारवाई केली आहे, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान, खासदारकी रद्द झाल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी शनिवारी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. "या देशात लोकशाही संपली आहे. या देशातील लोक जे मनात आहे ते बोलू शकत नाही. या देशाच्या संस्थांवर आक्रमण होत आहे. नरेंद्र मोदी आणि अदानी यांचं नातं हे याचं मूळ कारण आहे. मी मोदी नाही तर अदानींसंबंधी प्रश्न विचारत आहे. भाजपा अदानींचं संरक्षण का करत आहे? तुम्ही मोदींचं संरक्षण करा. तुम्हीच अदानी आहात म्हणूनच तर त्यांचं रक्षण करत आहात," असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.

माझं नाव सावरकर नाही, गांधी आहे - राहुल गांधी

"माझं नाव सावरकर नाही, गांधी आहे. गांधी कोणाची माफी मागत नाही. संसदेत मी बोलू देण्याची विनंती केली होती. मी दोनवेळा पत्रही लिहिलं होतं. मी लोकसभा अध्यक्षांची जाऊन भेट घेतली आणि तुम्ही लोकशाहीचे संरक्षणकर्ते आहात, बोलू द्या असं सांगितलं. त्यावर ते हसत आपण करु शकत नाही असं म्हटलं. त्यावर मी मग तुम्ही नाही करु शकत, तर मग कदाचित जाऊन नरेंद्र मोदींना भेटावं लागेल. ते तर हे होऊ देणारच नाहीत," असेही राहुल गांधी म्हणाले.