नोएडा, उत्तर प्रदेश : देशात लोकसभा निवडणूक २०१९ ची धामधूम सुरू आहे. आपलं मत हे महत्त्वाचं असून देशात गुप्त पद्धतीनं मतदान प्रक्रिया राबवण्यात येते. परंतु, उत्तरप्रदेशात एका व्यक्तीनं मात्र आपण कुणाला मत दिलं हे सोशल मीडियावर उघड केलं... तेही फोटोसहीत... याप्रकरणी या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.
गौतम बुद्ध नगरमध्ये एका व्यक्तीवर गुरुवारी निवडणूक आयोगानं जारी केलेल्या आचारसंहितेचं उल्लंघन करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यानं फेसबुकवर एक फोटोसहीत पोस्ट केली होती... या फोटोत उमेदवार कुणाला मतदान करतोय हे स्पष्टपणे दिसून येत होतं.
या व्यक्तीचं नाव युग सिसोदिया असं असून त्यानं फेसबुकवर दोन फोटो पोस्ट केले होते. एका फोटोत तो मतदान केंद्राबाहेर बोटावर शाई लावताना दिसतोय तर दुसऱ्या फोटोत मतदान केंद्राच्या आत तो इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनसोबत दिसत आहे. मतदान प्रक्रियेदरम्यान गोपनियतेचं उल्लंघन करण्याचा त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलंय.
निवडणूक आयोगाच्या नियमांचं उल्लंघन करताना आढळल्यास अशा नागरिकांवर योग्य ती कारवाई केली जाईल, असं जिल्हाधिकारी ब्रजेश नारायण सिंह यांनी म्हटलंय.