Chardham Yatra 2024 Opening Dates and Time: साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक समजल्या जाणाऱ्या अक्षय्य तृतीयेच्या सुमुहूर्तावर उत्तराखंडमधील चारधाम यात्रेचा शुभारंभ झाला आहे. यात्रेच्या पहिल्याच दिवशी केदारनाथ, यमुनोत्री आणि गंगोत्री धामची कवाडं भाविकांसाठी खुली झाली असून, दोन दिवसांनी म्हणजेच 12 मे रोजी बद्रीनाथ धामची कवाडंही खुली होणार आहेत.
शुक्रवारी पहाटे केदारनाथ मंदिर परिसरामध्ये अत्यंत मंगलमय वातावरण पाहायला मिळालं. अनेक भाविकांनी काही दिवस आधीपासूनच यात्रेच्या प्रारंभी ठिकाणांपासून मुख्य मंदिरापर्यंतचा प्रवास सुरु केला होता. ज्यानंतर अखेर चारधाम यात्रा सुरु झाली, डमरू निनादले आणि त्या मंगलध्वनीसह हर हर महादेवच्या गजरात केदारनाथ मंदिराची कवाडं उघडण्यात आली. मंदिराची कवाडं उघडण्याचा क्षण इतका भारावणारा होता की, पर्वतांच्या कुशीत असणाऱ्या या परिसरात जणू कैक सकारात्मक लहरींचा वावर उपस्थितांना जाणवत होता. एएनआय या वृत्तसंस्थेनं यासंदर्भातील व्हिडीओ शेअर केला.
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी आणि त्यांची पत्नी गीता धामी यांनी यावेळी मंदिरात हजेरी लावत बाबा केदारनाथ यांचे दर्शन घेतले. सध्याच्या घडीला उत्तराखंडमध्ये मोठ्या संख्येनं भाविकांची गर्दी पाहायला मिळत असून, पुढील अनेक दिवसांसाठी हेच चित्र इथं पाहायला मिळणार आहे. दरम्यान, चारही धामांची कवाडं खुली झाल्यानंतर उत्तराखंड सरकारच्या वतीनं या मंदिरांवर हेलिकॉप्टरनं पुष्पवृष्टी करण्यात येणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. सध्याच्या घडीला चारधाम यात्रेसाठी सरकारच्या वतीनं नोंदणी प्रक्रियेसोबतच यात्रेकरुंसाठी अनेक सुविधाही सुरू केल्या आहेत.
#WATCH | Rudraprayag, Uttarakhand: The doors of one of the twelve Jyotirlingas, Shri Kedarnath Dham open with full rituals and Vedic chanting with the chanting of 'Har Har Mahadev' by the devotees.
Chief Minister Pushkar Singh Dhami, along with his wife Geeta Dhami, present for… pic.twitter.com/MBRnJhxdH8
— ANI (@ANI) May 10, 2024
उत्तराखंडच्या गढवाल येथे असणाऱ्या केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री धाम येथील मंदिरांची कवाडं हिवाळ्यादरम्यान सहा महिन्यांसाठी बंद ठेवण्यात आली होती. ज्यानंतर शुक्रवारी अक्षय्य तृतीयेच्या निमित्तानं ही कवाडं उघडण्यात आली आणि चारधाम यात्रेचा शुभारंभ झाला.
दरम्यान, यात्रेच्या निमित्तानं आता अनेक इच्छुक भाविक यात्रेसंदर्भातील माहितीसाठी इंटरनेटचा आधार घेताना दिसत आहेत. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार सध्या भाविकांमध्या चारधाम यात्रेसंदर्भात कमालीचा उत्साह पाहायला मिळत असून, गुरुवारी सायंकाळी चार वाजेपर्यंत या यात्रेसाठी 22 लाखांहून अधिक भाविकांनी नोंदणी केली आहे. वेब पोर्टल, मोबाईल अॅप, व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून करण्यात आलेल्या नोंदणीचा एकूण आकडा सध्या 22,28,928 वर पोहोचला आहे. येत्या काळात हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता प्रशासनाकडून मिळत आहे.
चारधाम यात्रेसाठी देशविदेशातून येणारे भाविक आणि या ठिकाणच्या हवामानाचा आढावा घेत उत्तराखंड सरकार, केंद्र सरकार आणि आपत्ती व्यवस्थापन विभागही सतर्क असून, यात्रेतील सर्व हालचालींवर सुरक्षा यंत्रणांचीही करडी नजर असणार आहे.