आणखी एक झटका; LPG सिलिंडरच्या दरात वाढ, आता मोजावे लागणार 'इतके' रुपये

LPG Cylinder Price: एकिकडून काही वस्तूंच्या दरात कपात होणार असल्याचा निर्णय केंद्राकडून जारी केला जात नाही तोच दुसऱ्या एखाद्या गोष्टीचे दर वाढतात आणि सर्वसामन्यांचं आर्थिक गणित बिघडतं.   

सायली पाटील | Updated: Jul 4, 2023, 09:53 AM IST
आणखी एक झटका; LPG सिलिंडरच्या दरात वाढ, आता मोजावे लागणार 'इतके' रुपये  title=
Commercial LPG Price Hike know latest Cylinder prices

LPG Cylinder Price: भारतामध्ये दर महिन्याच्या पहिल्या तारखेला काही महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल होतात तर, काही नियम नव्यानं लागू केले जातात. या नियमांचा सर्वसामान्य नागरिकांच्या आयुष्यावर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष परिणाम होत असतो. प्रत्येक लहानमोठ्या गोष्टीचा हिशोब हा आर्थिक उलाढालीशीही जोडलेला असतो. अशातच आता देशात एका महत्त्वाच्या बदलामुळं काही मंडळींचं Budget कोलमडू शकतं. 

काय आहे हा बदल? 

प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी तेल उत्पादन कंपन्यांकडून गॅस सिलिंडरच्या दरांमध्ये बदल करण्यात येतात. 1 जून रोजीही असाच बदल झाला जिथं कमर्शिअल (व्यावसायिक वापरातील) एलपीजी सिलिंडरचे दर 83 रुपयांनी कमी करण्यात आले. ज्यामुळं अनेकांनाच दिलासा मिळाला. 

आता मात्र, याच मंडळींच्या चिंतेत भर पडणार आहे कारण, 4 जुलै रोजी तेल उप्तादन कंपन्यांकडून याच Commercial LPG चे दर वाढवण्यात आले आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे 1 जुलै रोजी एलपीजीच्या दरांत कोणताही बदल करण्यात आला नाही. पण, 4 जुलै रोजी झालेल्या नव्या दरांच्या घोषणेमुळं बरीच गणितं बिघडली. 

हेसुद्धा वाचा : पावसामुळं भाजीपाल्याचे दर कडाडले; नवे दर ऐकून बाजाराचा रस्ताच विसराल 

आता किती रुपये मोजावे लागणार?

ANI या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार 19 किलो वजनाचा व्यावसायिक एलपीजी दिल्लीमध्ये आता 1773 रुपयांऐवजी 1780 रुपयांना विकला जाईल. थोडक्यात आता जुन्या दरावर तुम्हाला 7 रुपये जास्त द्यावे लागणार आहेत. असं असलं तरीही घरगुती वापरातील सिलिंडरचे दर मात्र बदललेले नाहीत. त्यामुळं या सिलिंडरसाठी कोणतीही वाढीव रक्कम देण्याची गरज नाही. 

 

मागील चार महिन्यांपासून तेल कंपन्यांनी सातत्यानं एलपीजीचे दर घटवले होते. पण, यापुढं मात्र हे जुने दर लागू नसतील. त्यामुळं आता व्यावसायिक एलपीजीसाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. गेल्या काही महिन्यांचा आढावा घ्यायचा झाल्यास, 2023 या वर्षातील मार्च महिन्यामध्ये सिलिंडरचे दर 2119.50 रुपये इतके होते. एप्रिलमध्ये ही किंमत कमी होऊन 2028 रुपयांवर आली आणि त्यानंतर मे महिन्यात त्यात आणखी घट होऊन नवे दर 1856.50 रुपयांवर पोहोचले. जून महिन्यात दरानं 1773 हा आकडा गाठला. ज्यानंतर आता जुलै महिन्यात हे दर वाढले असून, 1780 वर पोहोचले आहेत.