Maharashtra Weather News : डिसेंबर महिन्यात कडाका वाढवणारी थंडी जानेवारीच्या पहिल्या 10 दिवसांनंतर मात्र कुठेतरी दडी मारून बसताना दिसली. जानेवारी महिन्याचे शेवटचे 10 दिवस उरलेले असतानाही ही थंडी काही पुन्हा जोर धरताना दिसत नाहीय. अर्थात नाशिक जिल्हा इथं अपवाद ठरला असून, मागील 24 तासांमध्ये नाशिकचं तापमान 10 अंशांच्याही खाली आल्याचं लक्षात आलं. पण, हा गारठाही फार काळ टीकला नसून, येत्या दोन दिवसांमध्ये राज्यात पुन्हा तापमान वाढीस सुरुवात होणार आहे असा इशारा हवामान विभागानं दिला आहे.
राज्याच्या काही भागांमधील वातावरण वगळता उर्वरित क्षेत्रांमध्ये तापमानवाढ अपेक्षित असल्याचं सांगितलं जात आहे. सध्या बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमध्ये सातत्य असल्याने थंडी राज्याच्या वेशीवर घुटमळताना दिसत आहे. उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरींच्या वाटेत यामुळं बरेच अडथळे निर्माण होत आहेत. ज्यामुळं गुलाबी थंडीचा आस्वाद मात्र अद्यापही राज्यातील काही भागांमध्ये घेता येत नाहीय.
डिसेंबर महिन्यातील काही दिवस वगळता राज्यातील तापमानाचा सरासरी आकडा 8 अंशांच्या खाली आला नसून, बहुतांशी किमान तापमान सरासरी 13 अंशांदरम्यानच राहिल्याचं पराहायला मिळालं.
मागील काही दिवसांपासून पहाटेची थंडी वगळता सूर्य डोक्यावर आल्या क्षणापासून उष्मा अधिक तीव्र होत असल्याची वस्तुस्थिती राज्याच्या बहुतांश भागांमध्ये दिसून आली आहे. जानेवारी महिन्याच्या उर्वरित दिवसांसाठी हाच प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला असून, फेब्रुवारीमध्ये प्रत्यक्ष तापमानवाढीस सुरुवात होणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.
देशाच्या हिमालयीन पर्वतरांगांच्या क्षेत्रासह उत्तर भारतात पश्चिमी झंझावात सक्रीय आहे. परिणामस्वरुप दिल्लीसह राजस्थान, पंजाब, हरियाणामध्ये थंडीचा कडाका टीकून आहे. असं असलं तरीही बंगालच्या उपसागरावरून बाष्पयुक्त वारे राज्याच्या दिशेनं येत असल्यामुळं उत्तरेकडील शीतलहरींचा राज्यावर फारसा परिणाम होताना दिसत नाहीय. त्यामुळं तापमानात वाढ नोंदवली जात आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभाग अर्थात आयएमडीच्या वृत्तानुसार 22 आणि 23 जानेवारीदरम्यान उत्तर- पश्चिम भारतात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. जानेवारी महिन्यातील उर्वरित दिवसांमध्ये तामिळनाडू आणि केरळच्या दक्षिणेकडील भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची जोरदार हजेरी पाहायला मिळू शकते.
हिमाचल, काश्मीरचं खोरं आणि उत्तराखंडच्या पर्वतीय क्षेत्रांमध्ये मात्र रक्त गोठवणारी थंडी आणखी तीव्र होणार असल्याचा इशारा आयएमडीनं स्थानिक प्रशासन आणि नागरिकांना दिला आहे.