नवी दिल्ली : राज्यामधला सत्तास्थापनेचा पेच अखेर सुटताना दिसत असतानाच काँग्रेसने समसमान खातेवाटपासाठी आग्रह धरला आहे. खात्यांच्या समसमान वाटपासाठी आग्रही राहायच्या सूचना काँग्रेस हायकमांडने त्यांच्या नेत्यांना दिल्या आहेत. ४४ हा आकडा असला तरी तो सत्तास्थापनेसाठी तेवढाच महत्त्वाचा आहे. ३३ कॅबिनेट आणि १० राज्यमंत्रीपदापैकी कॅबिनेट मंत्रिपदात समसमान फॉर्म्युलासाठी आग्रही राहण्याचं काँग्रेस हायकमांडने त्यांच्या नेत्यांना सांगितल आहे.
बैठकीमध्ये चर्चा वैयक्तिकरित्या कोणाला काय मिळेल याच्याऐवजी कुठल्या पक्षाला कोणती खाती मिळाली पाहिजेत याची करा, असे आदेशही काँग्रेस हायकमांडने त्यांच्या नेत्यांना दिले आहेत.
महाशिवआघाडीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रिपद आणि शिवसेनेला मुख्यमंत्रीपद मिळणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री व्हावं यासाठी शरद पवार, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नेते आग्राही आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बाळासाहेब थोरात यांच्या गळ्यात उपमुख्यमंत्रिपदाची माळ पडू शकते, तर अजित पवार यांनाही उपमुख्यमंत्रिपद मिळू शकतं. राष्ट्रवादीला अडीच वर्षं मुख्यमंत्रीपद मिळावं, यासाठी अजित पवार आग्रही असल्याचं समजतंय.
राष्ट्रवादीकडून मंत्रीपदी दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड, हसन मुश्रीफ, अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्या नावाची चर्चा आहे. तर काँग्रेसकडून अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर, विजय वडेट्टीवार, विश्वजीत कदम, अमित देशमुख, माणिकराव ठाकरे यांची मंत्रीपदी वर्णी लागणयाची चिन्हं आहेत.