पुडुचेरी : काँग्रेसच्या (Congress) हातातून आणखी एक राज्य गेले आहे. पुडुचेरीचे (Puducherry) मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी (V. Narayanasamy) यांच्या सरकारला पाय उतार व्हावे लागले आहे. आज सोमवारी काँग्रेसची सत्ता असणाऱ्या पुडुचेरीमध्ये मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी यांना विश्वासदर्शक (floor test) ठरावच्यावेळी बहुमत सिद्ध करता आले नाही. त्यानंतर सभापतींनी जाहीर केले की सरकार आपले बहुमत सिद्ध करू शकलेले नाही. (Congress V Narayanasamy Government fell in floor test in Puducherry)
विधानसभेत सरकारला बहुमत सिद्ध करता आले नाही. सरकार पडल्यानंतर मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी यांनी राज्यभवन गाठून राज्यपालांना आपला राजीनामा सादर केला. त्यानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. राजीनामा देण्यापूर्वी विधानसभेत झालेल्या चर्चेत मुख्यमंत्र्यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले. यावेळी भाजपवर गंभीर आरोप केले.
मुख्यमंत्र्यांनी व्ही. नारायणसामी यांनी सांगितले की, तामिळनाडूत आम्ही तामिळ आणि इंग्रजी अशा दोन भाषांचे अनुसरण करतो. परंतु भाजपने आपल्यावर हिंदी भाषेची सक्ती करावीशी वाटते. द्रमुक आणि अपक्ष आमदारांच्या पाठिंब्याने आम्ही सरकार स्थापन केले. त्यानंतर, आम्ही बर्याच पोट-निवडणुका घेतल्या. आम्ही सर्व पोटनिवडणुका जिंकल्या आहेत. हे स्पष्ट आहे की पुडुचेरीच्या लोकांचा आमच्यावर विश्वास आहे.
मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी म्हणाले की, सरकार स्थापन केल्यानंतर आम्ही शेतकर्यांचे सहकारी कृषी कर्ज माफ केले. पंतप्रधान मोदी छोट्या शेतकर्यांना 6 हजार रुपये देत आहेत तर आम्ही 37 हजार 500 रुपये देत आहोत. पंतप्रधान मोदी (PM Modi) आणि माजी एलजी किरण बेदी (Former LG Kiran Bedi) यांनी आम्हाला दडपण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरीही आम्ही लोकांच्या हितासाठी काम करू शकलो. राज्यात जनतेने निवडलेल्या लोकांनी राज्य केले पाहिजे, असे ते म्हणाले.
व्ही नारायणसामी म्हणाले की, माजी केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज पुडुचेरीला आल्या असता, त्यांनी असे म्हटले होते की पुडुचेरी हे केंद्रशासित प्रदेशापेक्षा पूर्ण विकसित राज्य असले पाहिजे. पण मोदी सरकारने ते आश्वासन कधीच पूर्ण केले नाही. विधानसभेत भाषण सुरु असताना गदारोळानंतर काँग्रेस आणि द्रमुकचे आमदार सभागृहाबाहेर गेले.
पुद्दुचेरीमध्ये काँग्रेसचे सरकार पडल्यानंतर भाजपने राहुल गांधी यांच्यावर कडाडून टीका केली आहे. भाजप नेते अमित मालवीय म्हणाले की, राहुल गांधी पुडुचेरी येथे गेले होते आणि तिथे काँग्रेसचे सरकार पडले.