नवी दिल्ली : दक्षिण-पूर्व दिल्लीतील दक्षिणपुरी परिसरात दोन कॉलनींच्या गटातील कबड्डी सामन्यात झालेल्या वादात एका १८ वर्षीय तरुणावर गोळी झाडण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री सव्वाआठच्या सुमारास सी ब्लॉक आणि २० ब्लॉक या दोन टीममध्ये कबड्डीचा सामना सुरु होता. यावेळी पॉईंट्सवरुन दोन्ही संघात वाद झाला.
यावेळी २० ब्लॉकच्या संघात खेळणाऱ्या अविनाश या तरुणावर प्रेक्षकांमधील दोन लोकांनी गोळी झाडली. या घटनेनंतर अविनाशला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले.
दरम्यान, या तरुणाची शस्त्रक्रिया झाली असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे समजतेय. हल्ला करणाऱ्या दोघांचीही ओळख पटली असून त्यांचा शोध सुरु आहे.