मुंबई : देशात कोरोनाच्या (coronavirus) दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव (second wave of corona) काही प्रमाणात कमी होतोय, पण संकट अजून पूर्णपणे टळलेलं नाही. कोरोनासंदर्भात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. हैदराबाद आणि नुकतंच मुंबईत काही ठिकाणी सांडपाण्यात कोरोनाचे विषाणू आढळून आले होते. पण आता नदीतच कोरोना विषाणू आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
गुजरातमधील महत्वाच्या नद्यांपैकी एक असलेल्या साबरमती नदीत चक्क कोरोना विषाणू आढळला आहे. (Coronavirus was found in the Sabarmati river) साबरमती नदीच्या पाण्याचे नमुने घेण्यात आले होते. या नमुन्यांमध्ये 25 टक्क्यांपर्यंत कोरोनाचा संसर्ग आढळून आला आहे.
इतकंच नाही तर साबरमतीशिवाय अहमदाबादमधले दोन मोठे तलाव असलेल्या कांकरिया आणि चंदोला तलावातही कोरोना विषाणू आढळल्याची नोंद करण्यात आली आहे. आता नैसर्गिक पाण्यातही कोरोनाचे विषाणू दिसू लागल्याने चिंता वाढली आहे.
गांधीनगरमधल्या आयआयटीने साबरमती नदीच्या पाण्याचे नमुणे परिक्षणासाठी घेतले होते. प्रोफेसर मनीष कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार या पाण्यात कोरोना विषाणू आढळला असून तो अतिशय धोकादायक आहे.
साबरमती नदीतून 694, कांकरिया तलावातून 549 आणि चंदोला तलावातून पाण्याचे 402 नमुने घेऊन त्याचा अभ्यास करण्यात आला होता. यात कोरोना विषाणूचे संसर्गित जीवाणू आढळले. त्यामुळे नैसर्गिक पाण्यातही विषाणू टिकू शकतो, अशी माहिती संशोधनातून समोर आली आहे.