मुंबई : कोरोना व्हायरसचा परिणाम माणसांच्या दैनंदिन जीवनावर झालाय. हा व्हायरस संक्रमित होऊ नये म्हणून घराबाहेर न पडण्यातच नागरिक समजदारी मानत आहेत. या पार्श्वभुमीवर मजदुरी करणाऱ्या कामगारांसाठी दिल्ली सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या बांधकाम मजुरांना पाच-पाच हजार देण्याची घोषणा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. गेल्या ४० तासांमध्ये कोरोना व्हायरस झाल्याचे कोणते प्रकरण दिल्लीत समोर आले नाही. यात पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या ३० वरुन २३ झाल्याचे अरविंद केजरीवाल यांनी सांगितले.
कोरोना व्हायरसची स्थिती तिसऱ्या टप्प्यात जाण्याच्या तयारीत असल्याचे मुख्यमंत्री केजरीवाल यावेळी म्हणाले. यावर सल्ला घेण्यासाठी डॉक्टरांची टीम तयार केली असून २४ तासांमध्ये ती आपला अहवाल देणार आहेत. काही रुग्ण यातून बाहेर पडले आहेत पण अजून खूप मोठी लढाई लढायची असल्याचे केजरीवाल म्हणाले.
काही घरमालक पायलट, एअर हॉस्टेस यांना जबरदस्ती बाहेर काढत आहेत. हे योग्य नाही. हे लोक जीव धोक्यात टाकून सेवा करत असून यांच्याशी असा व्यवहार करु नये. आपण मानसिकता बदलायला हवी असे आवाहन केजरीवाल यांनी केले.
मुख्यमंत्री केजरीवाल यांनी कोरोनाच्या भीतीमुळे दिल्लीत रेशनचा कोटा वाढविला आहे आणि ते मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअंतर्गत ७२ लाख लोकांना दरमहा ७.५ किलो रेशन मोफत देण्यात येणार आहे. रात्रीच्या निवारामध्ये मोफत भोजन दिले जाईल, असेही स्पष्ट केले आहे. दरम्यान, रेशन दुकानांवर गर्दी करु नये, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.
सध्या दिल्लीत बंदची कोणतही परिस्थिती नाही, परंतु गरज पडल्यास आम्ही दिल्लीमध्ये लॉकडाउन करु शकतो, असा इशारा दिला आहे. या व्यतिरिक्त दिल्लीतील वृद्ध, विधवा आणि अपंगांना पेन्शन दुप्पट देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. ज्येष्ठांनी घरे सोडू नये, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. पाचपेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊ नये, असेही ते म्हणाले.