नवी दिल्ली : दिल्लीतील सीमापुरी भागातील एका घरातून संशयास्पद बॅग जप्त करण्यात आली आहे. बॅगची माहिती मिळताच स्पेशल सेल (Delhi Police Special Cell)आणि एनएसजीची टीम घटनास्थळी दाखल झाली.
तपासादरम्यान बॅगेत IED (Improvised Explosive Device) असल्याचं समोर आलं. यानंतर पोलिसांनी तात्काळ परिसराची नाकेबंदी केली आहे. यासोबतच घरमालकाची चौकशी सुरू आहे. ज्या खोलीत ही बॅग सापडली त्या खोलीत 3-4 जण होते असे सांगण्यात येत आहे. मात्र पोलिस येण्यापूर्वीच ते फरार झाले.
काही दिवसांपूर्वी पोलिसांनी गाझीपूर मंडीजवळ स्फोटकं जप्त केली होती. या प्रकरणाच्या सीमापुरीत सापडलेल्या स्फोटकांशी संबंध असल्याचं दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या तपासात समोर आलं.
त्यानंतर पोलिसांनी आज दुपारी जुनी सीमापुरीताल गोल्डस्मिथ कॉलनीतल्या एका घरावर छापा टाकला. या घराला कुलूप होतं. कुलूप तोडत पोलिसांनी घरात प्रवेश केला असता त्यांनाएक संशयास्पद बॅग आढळून आली.
यानंतर दिल्ली पोलिसांनी NSG (National Security Guards) ला याची माहिती दिली. एनएसजीच्या पथकाने सीमापुरी इथं येऊन बॅग तपासली असता त्यात आयईडी आढळून आलं. या आयईडीचा स्फोट झाला असता तर मोठ्या संख्येने जीवीतहानी झाली असती.