गोवा : मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने प्रेमातील शारीरिक संबंध हे बलात्कार नसल्याचे म्हटले आहे. एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या प्रेमीयुगुलातील शारीरिक संबंध हा कधीच बलात्कार समजला जाणार नाही. दोघांच्या सहमतीने आलेली ही जवळीक बलात्कार नसल्याच हायकोर्टाने म्हटलं आहे.
योगेश पालेकरवर एका महिलेने लग्नाचं वचन देऊन बलात्कार केल्याचा आरोप ठेवला होता. या प्रकरणी न्यायालयाने 7 वर्षांची शिक्षा आणि 10 हजार रूपये दंड ठोठावला होता. 2013 मधील या प्रकरणाचा निकाल देताना न्यायालयाने आरोपीची शिक्षा आणि दंड रद्द केला. योगेश गोव्यातील एका कॅसिनोमध्ये शेफ म्हणून काम करत होता, तेथेच काम करणा-या एका तरूणीसोबत तो रिलेशनमध्ये होता.
कॅसिनोमध्ये काम करणारा आरोपी योगेश आणि तक्रारदार महिलेची 2013 मध्ये ओळख झाली. ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं. शेफ असलेल्या योगेशने महिलेला कुटुंबीयांशी ओळख करुन देण्यासाठी घरी नेलं. मात्र त्याच्या घरी त्यावेळी कोणीच नव्हतं. तक्रारदार महिला त्या रात्री आरोपीच्या घरीच राहिली. दोघांमध्ये शारीरिक संबंध आले. दुसऱ्या दिवशी सकाळी आरोपीने तिला घरी सोडलं. त्यानंतरही तीन ते चार वेळा दोघांमध्ये शरीरसंबंध आले. महिला कनिष्ठ जातीची असल्याचं कारण सांगून आरोपीने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला. त्यानंतर महिलेने बलात्काराची तक्रार दिली. आरोपीने लग्नाचं वचन दिल्यामुळे आपण शारीरिक संबंध ठेवण्यास संमती दिल्याची कबुली तिने दिली. महिलेने आरोपीला आर्थिक पाठबळ दिल्याचंही समोर आलं.