नवी दिल्ली: ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळ्यातील आरोपी व दलाल ख्रिश्चिअन मिशेलने काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांचा उल्लेख केल्याचा दावा अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) केला. दिल्लीतील विशेष न्यायालयात शनिवारी झालेल्या सुनावणीवेळी विशेष सरकारी वकील डीपी सिंग यांनी ही माहिती दिली. यामुळे गांधी कुटुंबीयांच्या आणि पर्यायाने काँग्रेससमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे. सरकारी वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, 'ईडी'च्या कोठडीत असताना ख्रिश्चिअनला त्याचे वकील अल्जो के जोसेफ भेटायला आले होते. त्यावेळी ख्रिश्चिअनने त्यांच्या हातात एक चिठ्ठी दिली. या चिठ्ठीत ख्रिश्चिअनने सोनिया गांधी यांच्याबद्दल काही प्रश्न विचारल्याचे 'ईडी'चे म्हणणे आहे. यामुळे खटल्याचे संदर्भ बदलू शकतात. वकिलांच्या माध्यमातून मिशेलला पढवले जाऊ शकते, असा आक्षेप 'ईडी'ने नोंदवला.
२७ डिसेंबरला 'ईडी'च्या अधिकाऱ्यांनी मिशेलचा जबाव नोंदवला होता. यावेळी त्याची वैद्यकीय तपासणी झाली. यानंतर मिशेलचे वकील अल्जो के जोसेफ त्याला भेटायला आले. तेव्हा मिशेल अचानकपणे उभा राहीला. त्याने आपला हात पुढे करून अल्जो के जोसेफ यांच्याशी हस्तांदोलन केले. यावेळी मिशेलने जोसेफ यांच्या हातात कागदाचा लहानसा कपटा दिला. जोसेफ यांनीही शिताफीने कागदाचा कपटा आपल्या मोबाईलच्या खाली सरकावला आणि नंतर खिशात ठेवून दिला. काहीच घडले नाही अशा आविर्भावात दोघेहीजण वावरत होते. मात्र, त्यावेळी कोठडीत उपस्थित असणाऱ्या 'ईडी'च्या उपसंचालकांना ही गोष्ट तात्काळ लक्षात आली. त्यांनी लगेचच मिशेल आणि जोसेफ यांना हटकले. त्यावेळी कागदावर लिहलेला मजकूर त्यांनी पाहिला. यामध्ये मिशेलने सोनिया गांधी यांच्यासंदर्भात काही प्रश्न विचारले होते, असा दावा 'ईडी'ने केला. यामुळे खटल्यातील ख्रिश्चियन मिशेलच्या आतापर्यंतच्या चौकशीतून समोर आलेल्या पुराव्यांशी छेडछाड होत असल्याचा आरोप 'ईडी'ने न्यायालयात केला. परिणामी मिशेलचा लिगल एक्सेस बंद करावा, अशी मागणी 'ईडी'ने केली.
मिशेल हा ऑगस्टा वेस्टलॅण्ड खरेदीतील ३६०० कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील आरोपी असून डिसेंबरमध्ये त्याला संयुक्त अरब अमिरातीमधून ताब्यात घेऊन भारतात आणण्यात आले होते.
दरम्यान, मोदी सरकार चौकशी यंत्रणांचा वापर करून गांधी घराण्याला लक्ष्य करत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. गांधी घराण्यातील व्यक्तींचे नाव घेण्यासाठी मिशेलवर दबाव आणला जात आहे. निवडणुकीच्या तोंडावर सरकारच्या अपयशावरून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी हा प्रकार सुरु असल्याचे आरोप काँग्रेसने केला आहे.