नवी दिल्ली : प्रत्येक पॅकिंगच्या खाद्यपदार्थांवर त्या पदार्थाची एक्सपायरी डेट म्हणजे अंतिम तारीख नमूद केलेली असते. परंतु मिठाईच्या दुकानातील दुधापासून बनवीलेल्या पदार्थांवर एक्सपायरी डेटचा उल्लेख केलेला नसतो. त्यामुळे केंद्र सरकारच्या अन्न पुरवठा विभागाने पदार्थांवर एक्सपायरी डेट टाकणं बंधनकारक केलं आहे. १ ऑक्टोबरपासून याची अंमलबजावणी करण्याचे आदेश बजावण्यात आले आहेत. सध्या देशावर कोरोना व्हायरसचे संकट समोर उभे आहे. त्यामुळे अन्न पुरवठा विभागाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
मध्यंतरी मिठाईच्या माध्यमातून विषबाधा झाल्याच्या अनेक घटनांनी डोकंवर काढलं होतं. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून आणि मिठाई खाल्ल्याने आरोग्याला हानी नको या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आहे.
मिठाईच्या दुकानात विक्रीसाठी ठेवण्यात आलेली मिठाई कोणत्या तारखेपर्यंत किंवा किती आठवडे खाता येईल हे नमूद करणं दुकान मालकासाठी बंधनकारक असणार आहे. शिवाय ग्रामीण भागांपासून ते मोठ्या शहरांना देखील अन्न पुरवठा विभागाकडून लागू करण्यात आलेले हे नियम पाळावे लागणार आहेत.