मुंबई : गेल्या दोन महिन्यांपासून देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. दरम्यान सोमवारपासून लॉकडाऊनचे अनेक नियम शिथिल करण्यात आले आहेत. अशा आणीबाणीच्या काळात सरकारने देखील त्यांच्या वतीने सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. प्रधानमंत्री कल्याण पॅकेज असो नाहीतर आरबीआयद्वारा कर्ज मोरेटोरियम अथवा सरकारद्वारा घोषित आत्मनिर्भर भारत आर्थिक पॅकेज.. या सर्व मार्गांच्या माध्यमातून सरकार भरतीय नागरिकांची मदत करत आहे.
तर आता सरकारने कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर जी कामं ३१ मार्चपर्यंत पूर्ण करण्याची मुदत दिली होती. सरकारने त्या मुदतीत आता ३० जूनपर्यंत वाढ केली आहे. सरकारकडून सांगण्यात आलेली काही कामे कोणत्याही परिस्थितीत ३० जूनपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
पॅनकार्डला आधारकार्डसोबत लिंक करा
पॅनला आधारशी जोडण्याची मुदत सरकारने ३० जूनपर्यंत वाढविली आहे. जर तुम्ही अद्याप आपले आधार कार्ड पॅनशी जोडलेले नसेल तर लवकरात लवकर जोडून घ्या. नाहीतर तुमचे पॅनकार्ड रद्द होण्याची शक्यता आहे.
करात सूट मिळण्यासाठी गुंतवणूक
आर्थिक वर्ष २०१९-२० साठी प्राप्तिकर विभागाने आयटीआर दाखल करण्याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबरपर्यंत वाढविली आहे. त्याचबरोबर कर वाचविण्यासाठी आयकर कायद्यातील कलम ८० सी, ८०डी, ८०ई अंतर्गत गुंतवणूक करण्याची मुदत ३० जून पर्यंत वाढवण्यात आली आहे.
२०१८-१९ साठी आयटीआर
तुम्ही अद्यापही आर्थिक वर्ष २०१८-१९ साठी आयटीआर रिटर्न भरला नसेल तर तुम्ही आता ३० जून पर्यंत २०१८-१९ साठी आयटीआर रिटर्न भरू शकता. याशिवाय ३० जूनपर्यंत सुधारित आयटीआरदेखील दाखल करता येणार आहे.
कर्मचाऱ्यांना मिळणारे फॉर्म-१६
सामान्यतः कर्मचाऱ्यांना त्यांच्या कंपनीकडून फॉर्म-१६ देण्यात येतो. परंतु सरकारने यावेळेस एका अध्यादेशाद्वारे फॉर्म-१६ भरण्याची तारखेत वाढ करून ३० जून केली आहे.
लहान बचत खात्याची ठेव
जर तुम्ही ३१ मार्च २०२० पर्यंत पीपीएफ किंवा सुकन्या समृध्दी खात्यात कोणतीही किमान रक्कम जमा केली नसेल, तर तुम्ही ती रक्कम ३० जून पर्यंत भरू शकता.