Saving Tips : दर दिवशी कळत नकळत का असेना, पण आपण अनेक गोष्टींवर पैसे खर्च करत असतो. इथंतिथं ये-जा करण्यासाठी, एखाद्या ठिकाणी गेलं असता खाण्यापिण्यासाठी किंवा मग इतर कोणत्या कारणानं हा खर्च केला जातो. यातही मोठी रक्कम खर्च होते तेव्हाच आपल्या लक्षात येतं की खर्चावर आळा घातला गेला पाहिजे. अन्यथा शंभर दोनशे रुपयांच्या खर्चाकडे फारसं लक्ष दिलं जात नाही. पण, मुळात हे 100 रुपयेसुद्धा तुम्हाला श्रीमंतीच्या वाटेवर नेऊ शकतात याची कल्पना आहे का?
समजा तुम्ही दर दिवशी 100 रुपये वाचवण्यास सुरुवात केली, तर दर महिन्याला तुम्ही 3 हजार रुपये Save करू शकता. थोडक्यात एक लहानशी सवय तुमच्या खात्यात हजारो रुपये देऊन जाईल. ही रक्कम तुम्ही विविध ठिकाणी गुंतवू शकता. हल्लीच्या दिवसांमधील गुंतवणुकीच्या पर्यायांचा विचार करायचा झाल्यास तुम्ही SIP ची निवड करू शकता.
थोडक्यात एसआयपीच्या माध्यमातून तुम्ही म्यूचुअल फंड्समध्ये (Mutual Funds) पैसे गुंतवू (Investment Planning) शकता. यामध्ये परताव्याची 100 टक्के हमी नसते. पण, यामध्ये दीर्घ काळासाठी केलेली गुंतवणूक नक्कीच तुमच्या फायद्याची ठरेल. जिथं तुम्हाला सरासरी 12 टक्के हिशोबानं व्याजाचा परतावाही मिळेल. त्यामुळं हा पर्याय तुम्हाला फायद्याचाच ठरेल.
आकडेमोड करून सांगायचं झाल्यास तुम्ही दर महिन्याला 3 हजार रुपये म्युच्युअल फंडमध्ये गुंतवल्यास 15 वर्षांमध्ये 5,40,000 इतकी रक्कम गुंतवता. 15 वर्षांमध्ये 12 टक्क्यांच्या हिशोबानं व्याज पाहिल्यास ही रक्कम 9,73,728 रुपयांवर पोहोचते. थोडक्यात गुंतवणूक केलेली रक्कम आणि व्याजाची रक्कम जोडल्यास तुम्हाला एकूण 15,13,728 रुपये इतकी मोठी रक्कम मिळेल.
इथं न थांबता तुम्ही आणखी 5 वर्षे यामध्ये गुंतवणूक करायचा विचार केल्यास तुम्हाला 20 व्या वर्षी एकूण 29,97,444 रुपये मिळतील. त्यामुळं तुम्ही एखादी आलिशान कार घ्यायचं स्वप्न पाहत असाल तर आतापासूनच त्यासाठीची आखणी सुरु करा. इतकंच नव्हे, तर या रकमेचा वापर तुम्ही खर खरेदीसाठीही करू शकता. फक्त गरज आहे ती म्हणते हातात वेळ असतानाच गुंतवणूक सुरु करण्याची.