मुंबई: सणासुदीच्या काळात सोन्याला पुन्हा एकदा झळाली आली तर खरेदीदारांच्या खिशाला आता कात्री लागणार आहे. याचं कारण म्हणजे सोन्याचे दर पुन्हा एकदा वधारले आहेत. भारतीय सराफ बाजारात सोन्याचे दर पुन्हा एकदा वाढले आहेत. सोनं 46 हजारापेक्षाही जास्त झालं आहे. त्यामुळे आता खरेदी करणाऱ्यांच्या खिशाला चांगलीच कात्री लागणार आहे.
10 ग्रॅम सोन्याची किंमत 46 हजार रुपयांपेक्षा जास्त झाली आहे. चांदीच्या दरामध्ये 633 रुपयांनी वाढ झाली आहे. गौरी-गणपती विसर्जनानंतर सोन्या चांदीच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून दिल्लीच्या सराफ बाजारात 45,776 रुपये प्रति तोळा सोनं होतं. मात्र आता 46 हजार रुपयांच्यावर गेल्यानं सराफ बाजारात आनंदाचं वातावरण आहे. तर सणसुदीच्या काळात सोनं वधारल्यानं खरेदीदारांमध्ये नाराजी आहे.
चांदी सराफ बाजारात प्रति किलोसाठी 61507 रुपये मोजावे लागणार आहेत. दिल्लीच्या सराफा बाजारपेठेत सोन्याच्या किमतीत 438 रुपये प्रति 10 ग्रॅमने मोठी वाढ झाली. त्यामुळे स्थानिक बाजारात आज पुन्हा सोन्याने प्रति 10 ग्रॅम 46 रुपयांची पातळी ओलांडली. तर एकूणच सोन्याचे दर आज 47,255 रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले आहेत. त्याचवेळी, आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याच्या किंमतीत कोणताही मोठा बदल झाला नाही.
गेल्यावर्षापासून सोन्याच्या दरात तब्बल 9 हजार रुपयांनी घट झाली. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात सोन्याचे दर 56,200 रुपये प्रती तोळा इतक्या दरावर पोहोचलं होतं. त्यामुळं आताचे आकडे आणि घट झालेले दर पाहता यामध्ये मोठा फरक स्पष्टपणे दिसून येत आहे. त्यामुळे अनेकजण सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याकडे वळताना दिसत आहेत.
दुसरीकडे सोन्याचे दर वर्षाअखेरीस 60 हजारापर्यंत पोहोचतील असा तज्ज्ञांचा दावा आहे. त्यामुळे येत्या काळात सोन्याच्या किंमती आणखी वाढल्या तर सोन्यात गुंतवणूक करणं थोडंसं अवघड होऊ शकतं. तर अनेकजण सोन्यात गुंतवणूक करण्याकडे वळले देखील आहेत. त्यामुळे आता सोन्याचे दर नवरात्रीपर्यंत कसे राहतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.