नवी दिल्ली : बलात्कार प्रकरणात डेरा सच्चा सौदाचा प्रमुख बाबा राम रहीम याला तुरूंगवासाची शिक्षा झाली. त्यानंतर पोलिसांच्या रडारवर असलेली हनीप्रीत इन्सान उर्फ प्रियांका तनेजा हिला पोलिसांनी अटक केली. आज (बुधवार, ४ ऑक्टोबर) तिला पंचकुला न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.
पोलिसांनी मंगळवारी दुपारी हनीप्रीतला अटक केली. बाबा राम रहीमला शिक्षा झाल्यापासून गेली ३६ दिवस ती फरार होती. पोलीस तिच्या मागावर होते. मात्र, ती त्यांना सतत गुंगारा देत होती. दरम्यान, न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठीही तिचे प्रयत्न सुरु होते. मात्र, त्याला यश आले नाही.
दरम्यान, प्रसारमाध्यमांमधून ती लोकांसमोर अचानक आली. आपण पूर्णपणे निर्दोष आहोत. आपल्यात व बाबा राम रहीम यांच्यात पवित्र नाते आहे. तसेच, बाबा राम रहीमसुद्धा निर्दोष असल्याचे हनीप्रीतने प्रसारमाध्यमांसमोर सांगितले. राम रहीमसोबत असलेल्या आपल्या नात्याला आणि आपल्याला बदनाम केले जात आहे, असेही तिने म्हटले आहे.
न्यायालयाने हनीप्रीतचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टानं फेटाळल्यानंतर पोलिसांनी तिला अटक केली. राम रहीमला शिक्षा झाल्यानंतर उसळलेल्या हिंसाचाराला फूस दिल्याचा आरोप हनीप्रीतवर आहे. गेल्या महिनाभरापासून ती पोलिसांना गुंगारा देत होती. राम रहीमला अटक केल्यानंतर पंचकुला परिसरात हिंसाचार उसळला होता. यांत 41 जणांचा मृत्यू झाला होता.