नवी दिल्ली : केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाची नवी ओळख यापुढं देशासमोर येणार आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सोमवारी या बदलाला सहमती दर्शवल्यानंतर हा बदल करण्यात आला. यापुढं शिक्षण मंत्रालय ही एचआरडी मंत्रालयाची नवी ओळख असेल.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची मान्यता मिळताच अधिकृतपणे याबाबतची माहिती देण्यात आली. ज्यामध्ये मंत्रालयाचं नवं नाव नमूद करण्यात आलं होतं.
मनुष्यबळ विकास मंत्रालयानं (MHRD) मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव दिला होता की, मंत्रालयाचे सध्याचे नाव बदलून शिक्षण मंत्रालय केले जावे. या प्रस्तावावर मोदी कॅबिनेटने जुलै महिन्यात शिक्कामोर्तब केलं होतं.
काही दिवसांपूर्वीच केंद्राकडून नव्या शैक्षणिक धोरणाला कॅबिनेटमध्ये मंजूरी दिली. ज्यामध्ये एचआरडी मंत्रालयाचं नाव बदलून शिक्षण मंत्रालय करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. तर बोर्ड परिक्षांचं पुर्नगठन करण्यात आल्याचंगी सांगण्यात आलं. याव्यतिरिक्त आरटीईच्या माध्यमातून आता १८ वर्षापर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाचा लाभ घेता येणार असल्याची बाबही यातून समोर आली होती.
President Ram Nath Kovind notifies Union Cabinet's decision to rename Ministry of Human Resource Development (HRD) as Ministry of Education. pic.twitter.com/EL5hhteZ3r
— ANI (@ANI) August 17, 2020
दरम्यान, १९८५ मध्ये शिक्षण मंत्रालयाचं नाव बदलून मनुष्यबळ विकास मंत्रालय अर्थात एचआरडी मंत्रालय असं करण्यात आलं होतं. त्यावेळी राजीव गांधी देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान होते.