नवी दिल्ली : भारत चीन एलएसीवरून चीनने आपले १० हजार सैनिक मागे घेतलेत. भारतीय हद्दीपासून हे सैनिक तब्बल २०० किमी मागे हटलेत. लडाखमध्ये सध्या थंडीचा कहर सुरू आहे. या थंडीचा सामना चिनी सैनिक करू शकले नाहीत.
भारतीय हद्दीला लागून असलेल्या चीनच्या पारंपरिक प्रशिक्षण भागातून हे सैन्य मागे घेण्यात आलंय. गेल्या वर्षी मार्च एप्रिलमध्ये चीनने एलएसीवर भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न सुरू केला.
गलवान खोऱ्यापासून पँगाँग त्सो भागापर्यंत विविध ठिकाणी चीनने तब्बल ५० हजार सैनिक तैनात केले होते. मात्र या भागातल्या भयंकर थंडीचा सामना चिनी सैनिक करू शकले नाहीत.
या भागात सध्या वजा १० अंश सेल्सिअस तापमान आहे. या तापमानात भारतीय सैनिकांनी तग धरली मात्र चिनी सैनिकांना ही थंडी असह्य झाल्याने चीनने अखेर १० हजार सैनिक मागे घेतलेत. विस्तारवादी चीनने अखेर रौद्र निसर्ग आणि भारतीय सैनिकांच्या वज्रनिर्धारापुढे माघार घेतलीय.