मुंबई : 1 एप्रिल 2022 पासून अनेक मोठे बदल होणार आहेत. जे तुमच्या खिशावर परिणाम करतील. हे बदल बँक ग्राहक करखात्यांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत असतील. या नियमांकडे दुर्लक्ष केल्यास तुमचं नुकसानही होऊ शकतं.
पोस्ट ऑफिसची स्किम
पोस्ट ऑफिसच्या स्मॉल सेव्हिंग स्कीममध्ये महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. १ एप्रिलपासून पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना, ज्येष्ठ नागरिक बचत योजना आणि मुदत ठेव खात्यावरील व्याजाचे पैसे तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन रोखीने घेता येणार नाहीत. हे पैसे तुमच्या बचत खात्यात जमा होतील. बचत खाते लिंक केल्यावर हे पैसे तुम्हाला इलेक्ट्रॉनिक पद्धतीने हस्तांतरित केले जातील.
पीएफ खात्यावर करमुक्त मर्यादा
पीएफ खात्यावरील अडीच लाख रुपयांपर्यंत करमुक्त मर्यादा करण्यात आली आहे. केंद्र सरकार १ एप्रिलपासून नवीन आयकर कायदा लागू करणार आहे. यानुसार आपलं सध्या असलेलं पीएफ खातं दोन भागांमध्ये विभागालं जाऊ शकतं, ज्यावर कर देखील आकारला जाईल.
अॅक्सिस बँकेच्या नियमात बदल
अॅक्सिस बँकेच्या बचक खात्यावरील नियमात १ एप्रिलपासून मोठा बदल होणार आहे. अॅक्सिस बँकेने मिनिमम बॅलेन्सची मर्यादा वाढवली आहे. मिनिमम बॅलेन्स १० हजारावरून १२ हजार रुपये करण्यात आला आहे.
जीएसटीचे नियम होणार सोपे
सीबीआयसीने वस्तू आणि सेवा कराअंतर्गत जारी करण्याच्या उलाढालीची मर्यादा आधीच्या 50 कोटींवरून 20 कोटींपर्यंत कमी करण्यात येणार आहे. १ एप्रिलपासून हा नियम लागू होईल.
म्युच्यूअल फंडात गुंतवणूकीचे नियम
म्युच्युअल फंड ट्रान्झॅक्शन एग्रीगेशन पोर्टल MF युटिलिटीज 31 मार्च 2022 पासून चेक-डीडी इत्यादीद्वारे पेमेंट सुविधा बंद करणार आहे. या बदलानुसार 1 एप्रिल 2022 पासून म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला फक्त UPI किंवा नेटबँकिंगद्वारे पैसे द्यावे लागतील.
औषधांच्या किंमती वाढणार
1 एप्रिलपासून पेन किलर, अँटीबायोटिक्स, अँटी व्हायरससह अत्यावश्यक औषधांच्या किमती वाढणार आहेत. सरकारने शेड्यूल्ड औषधांसाठी 10 टक्क्यांहून अधिक दरवाढ करण्यास परवानगी दिली आहे.