Indian Railways: रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी रेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा, पुढील महिन्यापासून ही मोठी सुविधा

Indian Railways:  भारतीय रेल्वे वंदे भारत रेल्वेच्या दोन अपग्रेड व्हर्जन आणणार आहे. या दोन्ही नव्या गाड्या सध्याच्या वंदे भारतपेक्षा खूप वेगळ्या असतील.

Updated: Jul 7, 2022, 10:39 AM IST
Indian Railways: रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी रेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा, पुढील महिन्यापासून ही मोठी सुविधा  title=

मुंबई : Indian Railways:  भारतीय रेल्वे वंदे भारत रेल्वेच्या दोन अपग्रेड व्हर्जन आणणार आहे. या दोन्ही नव्या गाड्या सध्याच्या वंदे भारतपेक्षा खूप वेगळ्या असतील, अशी माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. रेल्वेमंत्र्यांनी सांगितले की, पहिली अपग्रेडेड आवृत्ती ऑगस्ट महिन्यात लॉन्च केली जाईल.

पुढचा महिना म्हणजे ऑगस्ट महिना ट्रेनने प्रवास करणाऱ्यांसाठी खास असणार आहे. देशातील सेमी-हाय स्पीड ट्रेन वंदे भारत एक्सप्रेसशी संबंधित ही बातमी रेल्वे प्रवास करण्यासाठी चांगली आहे. 2019 मध्ये सुरु झालेल्या दोन वंदे भारत ट्रेनने 14 लाख किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला आहे. आता रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी वंदे भारतची अपग्रेडेड व्हर्जन ऑगस्टमध्ये लॉन्च केली जाईल, अशी घोषणा केली आहे.

75 हाय-स्पीड वंदे भारत रेल्वे चालवणार

प्रवासातील कमी वेळ आणि सोयी पाहता वंदे भारत ट्रेन प्रवाशांनाही खूप आवडली आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वेने देशात अनेक वंदे भारत गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. 15 ऑगस्ट 2023 पर्यंत 75 हाय-स्पीड वंदे भारत ट्रेन चालवण्याची भारतीय रेल्वेची योजना आहे. सध्या नवी दिल्ली ते कटरा आणि नवी दिल्ली ते वाराणसी या दोनच वंदे भारत ट्रेन धावत आहेत.

गांधीनगर येथील एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (EDII) येथे याबाबत माहिती देताना केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव सांगितले की , वंदे भारत एक्स्प्रेसच्या दोन अपग्रेडेड व्हर्जन येत आहेत. दुसरी अपग्रेड केलेली व्हर्जन पुढील महिन्यात म्हणजेच ऑगस्ट 2022 पर्यंत पुन्हा रुळावर येईल. तर तिसरी अपग्रेडेड व्हर्जन यायला वेळ लागेल.

रेल्वेमंत्र्यांनी सांगितले की, वंदे भारतची अपग्रेड केलेली व्हर्जन सध्याच्या ट्रेनपेक्षा वेगळी असेल. सध्या रुळांवर धावणाऱ्या वंदे भारतचा कमाल वेग 160 किमी प्रतितास आहे. त्याच्या दुसऱ्या अपग्रेडेड व्हर्जनचा कमाल वेग 180 किमी प्रतितास असेल आणि तिसरी अपग्रेडेड आवृत्ती 220 किमी प्रतितास या वेगाने धावेल. या दोन्ही गाड्या ज्या मार्गावर धावतील, तिथला प्रवास फार कमी वेळात पूर्ण करता येईल.

दर महिन्याला 5 ते 6 वंदे भारत रेल्वे

अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केले की, 15 ऑगस्ट 2023 पर्यंत 75 वंदे भारत गाड्या रुळावर चालवण्याची सरकारची योजना आहे. अशा परिस्थितीत ऑगस्ट 2022 पासून दर महिन्याला 5 ते 6 वंदे भारत गाड्या आणल्या जातील. पंतप्रधान मोदींनी 2021 मध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त 75 नवीन वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याचे लक्ष्य ठेवले होते.

येत्या काळात इंटरसिटी, शताब्दी आणि जनशताब्दी गाड्या बदलून संबंधित मार्गावर वंदे भारत रेल्वे सुरू करण्यात येणार आहे. नवीन वंदे भारत रेल्वे या अनेक अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असतील. सध्या,  वंदे भारत-2 मध्ये एअर स्प्रिंग्स बसवण्यात येणार आहेत. एअर स्प्रिंगमुळे ट्रेनचा प्रवास खूप चांगला आणि वेगवान होईल.