नवी दिल्ली : 'ओयो रुम्स' या भारतातील बजेट हॉटेल नेटवर्कचा संस्थापक अवघ्या २३ वर्षांचा आहे, हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल... पण हे खरं आहे. २३ वर्षांचा रितेश अग्रवाल आता चीनमध्येही आपलं पाऊल ठेवतोय. ६.५ लाख करोड रुपयांची गुंतवणूक करणाऱ्या मायासोशी सन यांनी रितेशला चीनमध्ये आपला व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत केलीय. मुळातच एखाद्या भारतीय कन्ज्युमर टेक्नॉलॉजी कंपनीनं चीनमध्ये दाखल होणं, हे कौतुकास्पद आहे. शेनजेनमध्ये या भारतीय कंपनीनं आपली घोडदौड सुरू केलीय. आणखीन २५ शहरांमध्ये विस्तार करण्याचाही रितेशचा मानस आहे.
परंतु, रितेशला हे यश सहजा-सहजी मिळालेलं नाही... रितेशनं तर आपलं महाविद्यालयीन शिक्षणही पूर्ण केलेलं नाही, तरीदेखील तो आज करोडोंचा मालक आहे. काही वर्षांपूर्वी रितेश ओडिसातील एका छोट्या भागात सिम कार्ड विकण्याचा धंदा करत होता. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर महाविद्यालयीन शिक्षणात रितेशला फारसा रस नव्हता. त्यानंतर अवघ्या १९ व्या वर्षी रितेशनं एका कंपनीची स्थापना केली आणि तो या कंपनीचा सीईओ बनला.
केवळ चार वर्षांत रितेशच्या कंपनीनं मोठ्या तेजीनं यश मिळवलंय. ओयोचा फुलफॉर्म म्हणजे 'ऑन योर ओन'... एका मुलाखतीच्या वेळी रितेशनं आपला संघर्षही इतरांसमोर मांडला. गुडगावमध्ये पहिलं हॉटेल सुरू केलं तेव्हा हाऊसकिपिंग, सेल्स आणि सीईओ अशी सर्व कामं त्यानंच पाहिली... ओयो रुम्सचा युनिफॉर्म घालून ग्राहकांच्या रुम्समध्ये जाऊन हाऊसकिंपिंगचं काम केलं... ग्राहक कधी त्याल खुश होऊन टिप्सही द्यायचे... एकदा तर एका ग्राहकाचं मूल सांभाळण्यासाठी त्याला ५० रुपयेही मिळाले होते.
सिमकार्ड विकणारा मुलगा ते ओयो रुम्स कंपनीचा मालक हा रितेशचा प्रवास अनेकांना प्रेरणा देणारा आहे.