नवी दिल्ली : बुधवारी राज्यसभेत ट्रिपल तलाक विरोधी विधेयक सादर झाल्यानंतर जबरदस्त गोंधळ झाला. काँग्रेसच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षांनी या विधेयकात सुधारणा करण्यासाठी सिलेक्ट समितीकडे पाठवण्याची मागणी केली. परंतु, मोदी सरकारनं या मागणीला नकार दिला.
दुसरीकडे, विरोधकांनी विधेयकावरून सरकारवर हल्लाबोल केलाय. काँग्रेससहीत संपूर्ण विरोधी पक्ष तीन तलाकच्या विरोधात आहेत... परंतु, भाजपला या मुद्द्याचा राजकीय फायदा करून घेण्याची घाई झालीय.
या विधेयकामुळे मुस्लिम महिलांना पूर्णपणे न्याय मिळणार नाही... परंतु, यामुळे भाजपला राजकीय फायदा मिळू शकतो, असं राज्यसभेचे विरोधी पक्षाचे नेते गुलाब नबी आझाद यांनी एका पत्रकार परिषदेत म्हटलंय.
भाजप सरकारनं जो कायदा बनवलाय त्यात पतीला तीन वर्षांपर्यंत तुरुंगात जावं लागेल परंतु, महिलेला पोटगी देण्याची जबाबदारीही पतीची आहे. त्यामुळे हा कायदा म्हणजे निव्वळ धुळफेक करणारा आणि महिलांसोबत अन्याय करणारा ठरेल... परंतु, हे सरकार सल्ला आणि चर्चेवर विश्वास करत नाही, असा आक्षेप काँग्रसेनं नोंदवलाय.