ISRO Chandrayaan 3 : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोकडून आतापर्यंत अवकाश क्षेत्रामध्ये मोलाचं योगदाना देत अनेक महत्त्वपूर्ण मोहिमा यशस्वी करण्यात आल्या आहेत. इस्रोच्या याच यशामध्ये आता आणखी एका महत्त्वपूर्ण गोष्टीची भर पडताना दिसत आहे. निमित्त ठरतंय ते म्हणजे चांद्रयान 3 (Chandrayaan 3 ) नं केलेली एक उकल.
जवळपास वर्षभरानंतरही चांद्रयान 3 कार्यरत असून, त्या माध्यमातून कमाल माहिती पृथ्वीवर इस्रोपर्यंत पोहोचत आहे. अशाच एका माहितीनुसार ज्या दक्षिण ध्रुवाला केंद्रस्थानी ठेवत भारताची चांद्रयान 3 मोहिम सुरू झाली त्याच दक्षिण ध्रुवावर कैक वर्षांपूर्वी एका अशा समुद्रानं अच्छादलं आहे जे कधीकाळचे लाव्हारसाचे पर्वत होते. थोडक्यात चंद्राच्या पृष्ठापासून त्याच्या अंतर्गत भागामध्येही लाव्हारस होता. या लाव्हारसाच्या साठ्यांना मॅग्मा ओशन किंवा लाव्हारसाचा महासागर असं संबोधलं जातं. हल्लीच Nature जर्नलमध्ये यासंदर्भातील वृत्त संशोधनपर लेखातून प्रसिद्ध करण्यात आलं.
वरील सिद्धांतांमुळं आता चंद्रावरील मॅग्मा महासागरासंदर्भातील इतरही अनेक प्रश्नांची उकल होऊ शकते असं म्हटलं जात आहे. शास्त्रज्ञ आणि अभ्यासकांच्या मते 4.5 अब्ज वर्षांपूर्वी जेव्हा चंद्राती उत्पत्ती झाली त्यावेळी कालांतरानं त्याचं तापमान कमी होण्यास सुरुवात झाली आणि फेरोअन एनोर्थोसाइट नावाचं वजनानं हलकं असणारं एक खनिज चंद्राच्या पृष्ठभागावर साचलं, तरंगू लागलं. फेरोअन एनोर्थोसाइट किंवा या वितळलेल्या लाव्हारसाच्या पर्वतानंच चंद्राचा पृष्ठभाग तयार झाला. नव्यानं झालेलं निरीक्षण आणि त्यानंतरचा खुलासा पाहता चंद्राच्या दक्षिण ध्रुवामध्ये फेरोअन एनोर्थोसाइटचं प्रमाणही आढळलं आहे.
फिजिकल रिसर्च प्रयोगशाळेतील डॉ. संतोष वडावले यांनी नेचरमधील हा लेख लिहिला असून, त्यांच्या माहितीनुसार चंद्राच्या सुरुवातीच्या काळातील उत्पत्तीसंदर्भातील अनेक सिद्धांत आला आणखी भक्कम होताना दिसत आहेत. दरम्यान, भारतानं केलेली ही उकल अतिशय महत्त्वपूर्ण असून यापूर्वी अपोलो मोहिमेदरम्यान अशाच रहस्यांचा उलगडा झाल्याचं पाहायला मिळालं होतं.
निरीक्षण आणि त्याआधारे मांडण्यात आलेल्या सिद्धांतांनुसार चंद्राची उत्पत्ती प्रोटोप्लॅनेट अर्थात ग्रह निर्माण होण्यापूर्वीच्या स्थितीत असताना झालेल्या आदळण्याच्या क्रियेमुळं झाली होती. यातूनच मोठा ग्रह म्हणजे पृथ्वी आणि लघुग्रह ठरला चंद्र. चंद्र अधिक उष्ण होता. ज्यामुळं त्याच्यावरील आवरण वितळून त्यातूनच मॅग्मा महासागराची उत्पत्ती झाली. हाच तो मॅग्मा किंवा लाव्हारसाचे वितळलेले अवशेष.