चालत्या वाहनातून अपहरण करून मुख्याध्यापकाची हत्या, भावानेच कट रचल्याचा आरोप

Jharkhand Crime : झारखंडमध्ये गुन्हेगारांनी एका प्राचार्यांची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपींनी बसंतराय येथील मौलाना अबुल कलाम आझाद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.नझिरुद्दीन यांची अपहरणानंतर हत्या केली आहे. शुक्रवारी सकाळी महागमा दिझोरीच्या मध्यभागी त्यांचा मृतदेह आढळून आला.

आकाश नेटके | Updated: Jun 9, 2023, 02:06 PM IST
चालत्या वाहनातून अपहरण करून मुख्याध्यापकाची हत्या, भावानेच कट रचल्याचा आरोप title=
(प्रातिनिधीक छायाचित्र)

Crime News : झारखंडच्या (Jharkhand Crime) गोड्डा जिल्ह्यात अपहरणानंतर एका महाविद्यालयाच्या प्राचार्यांची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी (Jharkhand Police) या प्रकरणात आतापर्यंत दोन जणांना अटक केली आहे. झारखंडच्या गोड्डा जिल्ह्यात असलेल्या मौलाना अब्दुल कलाम आझाद कॉलेजचे प्राचार्य डॉ. नजीरुद्दीन (Dr Naziruddin) यांची हत्या करण्यात आली आहे. अज्ञातांनी प्राचार्य डॉ.नजीरुद्दीन यांचे अपहरण करुन त्यांची हत्या केल्याचे समोर आले आहे. गुरुवारी रात्री अज्ञातांनी त्यांचे अपहरण केले होते. शुक्रवारी सकाळी त्यांचा मृतदेह महागामा दिजोरी दरम्यानच्या शिवारात आढळून आला. मात्र हत्येचे कारण सध्या स्पष्ट झालेले नाही. पोलीस कुटुंबीयांची चौकशी करून माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करत आहेत.

अपहरणानंतर काही तासांनी हत्या

प्राचार्य डॉ.नजीरुद्दीन यांचे झारखंड आणि बिहारच्या सीमेवरील कोरीना पुलाजवळून अपहरण झाल्याचे प्राथमिक तपासातून उघड झाले आहे. सशस्त्र असलेल्या आरोपींनी डॉ. नझिरुद्दीन यांच्या वाहनाच्या चालकाला पिस्तूल दाखवून त्यांची गाडी थांबवण्यात आली. त्यानंतर आरोपींनी डॉ. नझिरुद्दीन यांचे अपहरण केले. यानंतर नझिरुद्दीन यांच्या चालकाने पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ शोधाशोध केली आणि नातेवाईकांनीही त्यांच्या स्तरावर शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र नझिरुद्दीन काही सापडले नाहीत. त्यानंतर शुक्रवारी सकाळी महागमा दिजोरीजवळ त्यांचा मृतदेह आढळून आला. अपहरणानंतर काही तासांतच मुख्याध्यापकाची हत्या झाल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. 

भावानेच रचला कट

प्राचार्य डॉ नजीरुद्दीन हत्या प्रकरणात मोठा खुलासा झाल्याचा दावा केला जात आहे. झारखंड बिहारच्या सीमेजवळ डॉ. नझिरुद्दीन यांचा मृतदेह रक्ताने माखलेल्या अवस्थेत आढळून आला होता. त्यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली होती. पोलिसांच्या प्राथमिक तपासात कॉलेजमधील वादातून डॉ नजीरुद्दीन यांच्या भावानेच प्राचार्याची हत्या केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी डॉ. नजीरुद्दीनचा ड्रायव्हर अमन राज आणि शाकीरसह 3 जणांना ताब्यात घेतले आहे. 

राजकारण तापलं

 डॉ. नझिरुद्दीन यांच्या हत्येवरून झारखंडमध्ये राजकारण चांगलेच तापले आहे. भाजप विधिमंडळ पक्षाचे नेते बाबूलाल मरांडी यांनी कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून हेमंत सोरेन सरकारला घेरले आहे. बाबूलाल मरांडी म्हणाले की, झारखंडच्या कायदा व सुव्यवस्थेला बगल देत गुन्हेगारांनी गोड्डा येथील प्राचार्यांची अपहरण करून हत्या केली. गोड्डा पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे मुख्याध्यापकांना वाचवता आले नाही.