मुंबई : येत्या १ जुलैपासून देशभर गुडस् अॅन्ड सर्व्हिसेस टॅक्स अर्थात जीएसटी लागू होणार आहे. ही यंत्रणा सुरळीत सुरु झाली तर देशात नोकऱ्यांचा पाऊस पडेल, असा अंदाज बाजार तज्ज्ञांनी व्यक्त केलाय.
लवकरच जीएसटी लागू होणार असल्यानं सगळ्याच कंपन्यांतील जीएसटी टीम सज्ज झाल्यात. यामुळे, टॅक्स आणि टेक्नॉलॉजी प्रोफेशनल्सची मागणी बरीच वाढलीय. जीएसटीनंतर एफएमसीजी सेक्टरमध्ये व्यावसायिकांची गरज भासणार आहे. त्यानंतर कन्झ्युमर गुडस्, फार्मास्युटिकल्स, रिअल इस्टेट, बँकिंग आणि इन्शुरन्स सेक्टर्समध्येही अभ्यासू व्यक्तींची गरज आहे. तज्ज्ञांच्या माहितीनुसार, कंपन्यांना नव्या कर व्यवस्थेचा फायदा उचलण्यासाठी या क्षेत्रांतील तज्ज्ञ व्यावसायिकांची मदत घ्यावी लागणार आहे.
जीएसटी पोर्टलमुळे ९० लाख नवीन करदाते रजिस्टर्ड होण्याची शक्यता वर्तवली जातेय. यासाठी जवळपास १३ लाख प्रोफेशनल्सची गरज मार्केटला लागू शकते. यामध्येही, वकील, सीए, कॉस्ट अकाऊंटन्टस आणि ट२क्स कन्सल्टंटन्टसची मागणी जास्त असेल तर अपडेट टेक्नॉलॉजीसाठी कंपन्याना सॉफ्टवेअर प्रोफेशनल्सची आवश्यकता असेल.
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, कारपेंटर, मिस्त्री, प्लंबर, इलेक्ट्रिशिअन, ड्राफ्टसमेन, टेलर, फूड टेक्नॉलॉजिस्ट आणि मार्केटिंग क्षेत्रातील अर्धकुशल कामगारांसाठीही ही योग्य संधी ठरेल... कारण जीएसटी लागू झाल्यानंतर या कामांसाठी कामगारांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जातेय.
परंतु, या नोकऱ्या दीर्घकाळ टीकणार नाहीत, अशी चेतावणीही एक्सपर्टस देत आहेत. सीमेंट आणि आयटी सोडून इतर क्षेत्रात निर्माण होणाऱ्या नोकऱ्या अस्थिर स्वरुपातील असू शकतात. चांगला पगार देऊन नोकरी स्विकारणाऱ्या लोकांना योग्य टेक्नॉलॉजी आल्यावर कंपन्यांकडून बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो.