FIR For Theft Of Slippers From Outside Temple: सामान्यपणे चप्पला चोरीला गेल्यानंतर आपल्यापैकी अनेकजण विषय सोडून देतात. अनेकदा धार्मिक स्थळांच्याबाहेर होणारी अशी चप्पल चोरी भारतात तर सामान्य बाब आहे. अशा चोऱ्या भारतात जवळजवळ रोज होतात. यात ज्याची चप्पल चोरीला गेली त्याला क्षणभराच्या दु:खाव्यतिरिक्त काही विशेष वाटत नाही. मात्र कानपूरमधील एका व्यक्तीने चोरीला गेलेल्या चप्पलेचा विषय फारच गांभीर्याने घेतला. या तरुणाने चप्पल चोरीला गेल्याची थेट पोलिसांकडे तक्रार केली आहे. एका मंदिराच्याबाहेरुन आपली चप्पल चोरीला गेल्याची थेट लेखी तक्रार या तरुणीने पोलिसांकडे केली आहे.
चप्पल चोरीला गेल्याप्रकरणी कोणी तक्रार केल्याचं सामान्यपणे ऐकायला मिळत नाही. मात्र कानपूरमधील दाबाऊली येथील कांतीलाल निगम यांनी त्यांच्या स्पीकर्स चोरीला गेल्याची तक्रार केली आहे. शहरातील प्रसिद्ध भैरवबाबा मंदिरामध्ये दर्शनासाठी गेलेले असताना कांतीलाल यांची स्लीपर मंदिराबाहेरुन चोरीला गेली. मंदिरामध्ये दर्शन घेऊन कांतीलाल बाहेर आले तेव्हा त्यांनी नुकत्याच घेतलेल्या स्लीपर्स चोरीला गेल्याचं निदर्शनास आलं. त्यांनी जवळजवळ अर्धातास त्या ठिकाणी आपल्या स्लीपर्सचा शोध घेतला. अखेर स्लीपर्स न सापडल्याने त्यांनी ई-एफआयआर करण्याचा निर्णय घेतला. कांतीलाल हे रागाच्याभरात अनवाणीच आपल्या घरी परतले.
कांतीलाल यांनी तक्रारीमध्ये, "मी 2 दिवसांपूर्वीच नव्या स्लीपर्स विकत घेतल्या होत्या. प्रत्येक रविवारी मी भैरवबाबा मंदिरामध्ये दर्शनासाठी जातो. रविवार हा भैरवबाबा दर्शनासाठी पवित्र मानला जातो म्हणून मी याच दिवशी दर्शनला जातो. मी मंदिराबाहेर आलो तेव्हा माझ्या चप्पला मंदिराबाहेरुन गायब होत्या. त्यानंतर मी ई-एफआयआर दाखल केली. कारण चोराला मोकाट सोडू नये असं मला वाटतं," असं म्हटलं आहे.
या प्रकरणामध्ये पोलिसांनी तपास सुरु केला असून ते सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करत आहेत. कलम 379 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी कांतीलाल यांच्याकडे चप्पल खरेदीचं बील मागितलं आहे. सध्या पोलीस या चोराचा शोध घेत असून लवकरच हाती काहीतरी लागेल अशी पोलिसांना अपेक्षा आहे.
पुण्यामध्येही 2017 साली एका व्यक्तीने स्लीपर्स चोरीला गेल्याची तक्रार दाखल केली आहे. घरात चोरी करायला आलेल्या चोराने घरफोडी करण्याऐवजी माझ्या स्लीपर्स चोरल्या असा दावा या व्यक्तीने केला होता. चप्पलची किंमत कमी असली तरी दुसऱ्याच्या मालकीची गोष्ट अशाप्रकारे चोरने हा गुन्हा असल्याचं सर्वांच्या लक्षात यायला हवं म्हणून आपण तक्रार केल्याचा युक्तीवादही या पुणेकराने केला होता.