बंगळुरू - कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. त्यांचा पक्ष जनता दल (सेक्युलर) च्या एका स्थानिक नेत्याची हत्या करण्यात आल्यानंतर हल्लेखोरांना निर्दयीपणे मारा, असे आदेश कुमारस्वामी यांनी दिले आहेत. मोबाईल फोनवरून पोलिसांशी बोलताना त्यांनी थेट हे आदेश दिले. एका स्थानिक पत्रकाराने त्यांच्या संभाषणाचे शूटिंग केले असून, त्याचा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे. थेट मुख्यमंत्रीपदावरील व्यक्ती पोलिसांना अशा पद्धतीने आदेश देते, यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली.
#WATCH Karnataka CM HD Kumaraswamy caught on cam telling someone on the phone 'He(murdered JDS leader Prakash) was a good man, I don't know why did they murder him. Kill them (assailants) mercilessly in a shootout, no problem. (24.12.18) pic.twitter.com/j42dqiRs0a
— ANI (@ANI) December 25, 2018
कर्नाटकमध्ये कुमारस्वामी गुंडाराजलाच प्रोत्साहन देत असल्याची टीका राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष भाजपने केली आहे. एखाद्याला निर्दयीपणे मारण्याचे आदेश थेट कॅमेऱ्यासमोर देऊन कुमारस्वामी यांनी गुंडगिरीलाच प्रोत्साहन दिले आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था नसल्याचेच यातून दिसते. अशा पद्धतीने व्यवस्था उधळून लावण्याचे आणि हुकूमशाही करण्याचे काम त्यांनी याआधीही केले होते, असा आरोप भाजपने केला आहे.
दरम्यान, कुमारस्वामी यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. मुख्यमंत्री म्हणून मी काहीही आदेश दिलेले नाहीत. माझ्या स्थानिक नेत्याची हत्या झाल्याचे पोलिसांनी सांगितल्यावर केवळ भावना अनावर झाल्यामुळे मी तसे बोललो. त्यावेळी मी भावनिक झालो होतो. हल्लेखोरांनी याआधीही दोघांची हत्या केली आहे. त्यामुळे ते तुरुंगातच होते. दोन दिवसांपूर्वी तुरुंगातून सुटका झाल्यामुळे ते बाहेर आले आणि परत त्यांनी माझ्या पक्षाचे स्थानिक नेते प्रकाश यांची हत्या केली. त्यामुळे मला भावना आवरता आल्या नाहीत. हल्लेखोर जामीनाचा गैरवापर करत आहेत, असे कुमारस्वामी यांनी म्हटले आहे.