प्रताप नाईक, झी मीडिया, म्हैसूर : कर्नाटकात सिद्धरामय्या आणि त्यांचा मुलगा यथींद्र या दोघांच्याही मतदार संघातली लढत रंगतदार होणार आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या म्हैसूर जिल्ह्यात जे.डी.एस आणि भाजापानं कडवं आव्हाण निर्माण केलंय. मुख्यमंत्री ज्या मतदारसंघात उभं राहणार आहेत, त्या चामुंडेश्वरी मतदार संघात मुख्यमंत्र्यांना घेरण्याची रणनीती भाजप आणि जे.डी.एसनं आखलेली आहे. त्यामुळं संपूर्ण कर्नाटकचं लक्ष या चामुंडेश्वरी मतदारसंघात मुख्यमंत्री सिद्धरामय्या याचं काय होणार? याकडेच लागून राहिलंय.
कुणी 'अरे' केलं तर त्याला लगेच 'का रे' म्हणणारे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे म्हैसूर जिल्ह्यातल्या सिद्धरामणवुंडीचे... म्हैसूर शहराच्या शेजारच्या वरुणा विधानसभा मतदारसंघाच ते नेतृत्व करतात. पण, यंदा मात्र त्यांनी परंपरागत मतदारसंघ मुलगा यथींद्रला दिलाय... आणि सिद्धरामय्या शेजारच्या चामुंडेश्वरी मतदारसंघातून निवडणूक लढवतायत... मुख्यमंत्री झाल्यापासून सिद्धरामय्या होम पीच असलेल्या म्हैसूर जिल्ह्याकडे गांभीर्यानं लक्ष देत नाहीत, अशी ओरड होते... या मतदारसंघातून जनता दल सेक्युलरनं माजी मंत्री जी. टी. देवेगौडासारखा तगड्या उमेदवाराला निवडणूक रिंगणात उतरवलंय... त्यातच म्हैसूरचे भाजपा खासदार प्रताप सिम्हा हे जे.टी.देवेगौडा यांना मदत करत असल्याची चर्चा आहे... तर भाजपकडून गोपाल राव रिंगणात आहेत. त्यामुळच चामुंडेश्वरीची लढत सिद्धरामय्यांसाठी प्रतिष्ठेची झालीय.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आपला मुलगा डॉ. यथेंद्रला वरुणा विधानसभा मतदारसंघातून तिकीट मिळवून दिलं... या मतदारसंघात सुरुवातीला येडीयुराप्पा यांचे चिरंजीव विजेंद्रा याला उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न झाले, पण नंतर मात्र भाजपनं अखरेच्या क्षणी विजेंद्रला तिकीट नाकारलं. वरुणा विधानसभा मतदारसंघात येडीयुराप्पा यांचा मुलगा विजेंद्र याने निवडणूक लढवावी, असा आग्रह भाजाप कार्यकर्ते आणि स्वत: विजेंद्र याचा स्वत:चा होता. पण भाजापमधीलच येडीयुराप्पा यांचे विरोधक असणाऱ्या नेत्यांनी विजेंद्र याला तिकीट मिळू नये, यासाठी मोठा प्रयत्न केला आणि त्याचाच फटका भाजाप या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात बसताना दिसून येतोय.
भाजपनं विजेंद्र याला तिकीट नाकारल्यानं वरुणा विधानसभा मतदार संघात सिद्धरामय्यांचे चिरंजीव यथेंद्र यांचा मार्ग काही अंशी सोपा झालाय. विजेंद्र याचं तिकीट नाकारल्यानं त्यांचे कार्यकर्ते संतापलेत... त्यामुळेच भाजप कार्यकर्त्यांनी भाजपऐवजी नोटाला मतदान करण्याचं अभियान सुरू केलंय. या मतदार संघात विजेंद्रला तिकीट मिळावं, अशी आमची अपेक्षा होती. त्याचे तिकीट रहावं यासाठी आम्ही प्रयत्न केला. एकीकडं मुख्यमंत्र्याचा मुलगा आणि दुसरीकडं माजी मुख्यमंत्र्यांचा मुलगा यांची लढत चांगली होईल, असं वाटल होतं. ते ५० हजार मताने आले होते. पण भाजापा नेते आनंतकुमार, प्रकाश आणि प्रताप सिम्हा यांनी आर.एस.एस. मधून आलेल्या व्यक्तीला उमेदवारी देवू केली. त्यामुळं विजेंद्रचे तिकीट चुकलं, अशी प्रतिक्रिया भाजप कार्यकर्त्यांनी व्यक्त केलीय.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना चामुंडेश्वरी मतदारसंघात आणि वरुणा मतदारसंघात मुख्यमंत्री चिरंजीव यथेंद्रा याला रोखायची रणनीती आखण्यात आली होती. पण वरुणा मतदारसंघात यथेंद्रा याला घेरण्यामध्ये भाजापला म्हणावं तसं यश आलेलं नाही. त्यामुळं सिद्धरामय्या यांनी काही अंशी सुटकेचा निश्वास टाकलाय.