क्षत्रिय करणी सेनेचे (Karni Sena) प्रमुख राज शेखावत यांनी सध्या अहमदाबादच्या साबरमती जेलमध्ये (Ahmedabad's Sabarmati Central) असणाऱ्या लॉरेन्स बिष्णोईची (Lawrence Bishnoi) हत्या करणाऱ्या कैद्याला बक्षीस जाहीर केलं आहे. याआधी करणी सेनेने पोलिसांना लॉरेन्स बिष्णोईचा (Lawrence Bishnoi) एन्काऊंटर केल्यास 1 कोटी 11 लाख 11 हजार 111 रुपयांची बक्षीस देऊ असं जाहीर केलं होतं. यानंतर आता त्यांनी थेट साबरमती जेलमधील (Ahmedabad's Sabarmati Central) कैद्यांनाच ही ऑफर दिली आहे.
सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओत राज शेखावत यांनी आपल्या हेतूंची पाठराखण केली आहे. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांवरुन होणाऱ्या टीकेवरही भाष्य करत आपण कोणाच्या बापाला घाबरत नाही असं म्हटलं आहे. यावेळी त्यांनी लॉरेन्स बिष्णोईला जो ठोकेल त्या कैद्याला करणी सेना जे बक्षीस पोलिसांना जाहीर केलं होतं ते देईल असं जाहीर केलं.
राज शेखावत सांगतात की, "मी याआधी जाहीर केल्याप्रमाणे जो पोलीस कर्मचारी लॉरेन्स बिष्णोईचा एन्काऊंटर करेल त्याला 1 कोटी 11 लाख 11 हजार 111 रुपयांचं बक्षीस दिलं जाईल. पण आता त्यात आणखी एक गोष्ट जोडत आहोत. साबरमती जेलमधील जो कैदी लॉरेन्स बिष्णोईला ठोकेल त्यालाही क्षत्रीय करणी सेना याच किंमतीचं बक्षीस देईल".
सीमेपलीकडे अंमली पदार्थांच्या तस्करीच्या गुन्ह्यात लॉरेन्स बिष्णोई सध्या गुजरातच्या साबरमती तुरुंगात बंद आहे. एप्रिलमध्ये बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणातही त्याचं नाव आहे. परंतु मुंबई पोलीस त्याला ताब्यात घेऊ शकले नव्हते.
सोशल मीडियावर अपलोड केलेल्या एका व्हिडिओमध्ये, क्षत्रिय करणी सेनेचे प्रमुख म्हणाले की, लॉरेन्स बिश्नोई आमच्या मौल्यवान रत्न आणि वारसा अमर शहीद सुखदेव सिंह गोगामेडीजी यांचाही मारेकरी आहे. जयपूरमध्ये 5 डिसेंबर 2023 रोजी अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून करणी सेनेचे प्रमुख सुखदेव सिंग गोगामेडी यांची हत्या केली होती. हत्येनंतर काही तासांनी लॉरेन्स बिष्णोई टोळीने त्यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली.
बिष्णोईची टोळी संपूर्ण देशभरात कार्यरत आहे. बिष्णोईच्या टोळीने बाबा सिद्दीकीची हत्या आणि सलमान खानच्या घराबाहेर या वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली होती. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर ही टोळी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. लॉरेन्स बिष्णोईच्या टोळीने बाबा सिद्दीकींचा “डॉन दाऊद इब्राहिमशी संबंध” आणि सलमान खानशी त्याच्या जवळच्या वैयक्तिक संबंधांमुळे खून केल्याचा आरोप आहे.