चंदीगड: टेलिव्हिजनवरील 'कौन बनेगा करोडपती' या रिअॅलिटी शोमध्ये काही दिवसांपूर्वी आलेला दविंदर सिंग सध्या चांगलेच चर्चेत आहेत. केबीसीच्या गुरुवारी प्रसारित झालेल्या भागात दविंदर सिंग यांनी ६ लाख ४० हजार रूपये जिंकले होते. मात्र, एका वेगळ्याच कारणामुळे ते प्रकाशझोतात आले आहेत.
फरीदाबाद येथे दविंदर सिंग हे 'आप की रसोई' या नावाने फिरते भोजनालय चालवतात. या भोजनालयाच्या माध्यमातून गरिबांना अवघ्या पाच रुपयांमध्ये भरपेट जेवण दिले जाते.
दविंदर सिंग यांनी केबीसीमध्ये अमिताभ बच्चन यांनाही 'आप की रसोई'बद्दल सांगितले होते. लहानपणापासून मी गुरुद्वारात गरजू आणि ज्येष्ठ व्यक्तींना मदत करणाऱ्या उपक्रमांमध्ये सहभागी व्हायचो. यावरूनच मला 'आप की रसोई' सुरु करण्याची कल्पना सुचली, असे दविंदर यांनी अमिताभ यांना सांगितले.
यापूर्वी दविंदर पुण्यात राहायला असतानाही अशाचप्रकारे समाजसेवा करायचे. ते हिंजवडी येथील इन्फोसिस कंपनीत कामाला होते. त्यावेळी 'सरस्वती अनाथालय शिक्षण' नावाच्या आश्रमशाळेत ते अन्नदान करायचे.
मध्यंतरी दिल्लीत दोन लहान मुलांचा भुकबळी गेल्यानंतर दविंदर अस्वस्थ झाले होते. देशाच्या राजधानीत ही अवस्था असेल तर इतर ठिकाणी काय होत असेल, हा विचार सतत त्यांच्या मनात यायचा. अखेर दविंदर यांनी शक्य तितक्या लोकांना अन्नदान करायचा निर्धार केला. यातूनच 'आप की रसोई' ही संकल्पना जन्माला आली. विशेष म्हणजे दविंदर यांचे कुटुंबीयही त्यांना यामध्ये पूर्णपणे मदत करतात.
दविंदर सिंह आणि त्यांचे कुटुंबीय आठवड्यातील एक दिवस आपल्या इनोव्हा गाडीतून जेवण घेऊन संपूर्ण शहरात फिरतात. यानंतर रस्त्यात भेटणाऱ्या प्रत्येक गरजू व्यक्तीला पाच रुपयांत भरपेट जेवण दिले जाते.
केबीसीत आल्यापासून त्यांच्या या उपक्रमाला मदत करण्यासाठी अनेकजण पुढे सरसावले आहेत. त्यांना यासाठी अनेक फोनही येतात. त्यामुळे आता मी आठवड्यातून एकदाच नव्हे तर दररोज लोकांना जेवण देऊ शकतो, असे दविंदर आनंदाने सांगतात.