Kerala Kozhikode Nipah Case: केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी मंगळवारी केरळच्या कोझिकोड येथे 2 व्यक्तींचा अनैसर्गिक मृत्यू निपाह व्हायरसमुळेच झाल्याच्या वृत्ताला दुजोराला दिला आहे. मांडविया यांनी निपाह व्हायरलच्या फैलाव झाल्यासंदर्भातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राज्य सरकारच्या मदतीसाठी तज्ज्ञांची एक टीम केंद्र सरकारने पाठवल्याची माहिती दिली आहे. "मी केरळच्या आरोग्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. यंदाच्या मौसमामध्ये या विषाणूसंदर्भात अनेकदा चर्चा झाली आहे. या विषाणूची प्रकरणं समोर येत आहे. हा विषाणू वटवाघुळांच्या माध्यमातून पसरतो. आरोग्य मंत्रालयाने काही निर्देशक तत्वांचा समावेश असणारं पत्रक तयार केलं असून त्यात काय काळजी घ्यावी हे सुद्धा नमूद केलेलं आहे," असं मांडविया म्हणाले.
कोझिकोड येथे 2 व्यक्तींचा अनैसर्गिक मृत्यू झाल्याचं समजल्यानंतर येथील स्थानिक आरोग्य प्रशासन खडबडून जागं झालं आहे. एका खासगी रुग्णालयात हे दोन्ही मृत्यू झाले आहेत. मृत झालेल्या दोघांपैकी एकाच्या नातेवाईकाला आयसीयूत दाखल करण्यात आलं आहे. त्यामुळे या मृत व्यक्तींच्या संपर्कातील 5 जणांची तपासणी करण्यात आली असून त्यांच्या चाचण्यांचे नमुने तपासणीसाठी पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे पाठवण्यात आले आहेत. बुधवारपर्यंत त्याचे रिपोर्ट येतील अशी अपेक्षा आहे. आरोग्य विभागाकडून निपाहच्या पार्श्वभूमीवर अलर्ट जारी करण्यात आला आहे. याआधीही कोझिकोड येथे निपाहची अनेक प्रकरणं समोर आली आहेत.
तपासाणीसाठी जे नमुने पाठवण्यात आले आहेत त्यापैकी एक नमुना हा मरण पावलेल्या व्यक्तीचा आणि इतर 4 नमुने या व्यक्तीच्या संपर्कात असलेल्या 4 जणांचे आहेत. केरळ सरकारने मंगळवारी कोझिकोड येथे एक नियंत्रण कक्ष स्थापन केलं आहे. तसेच सुरक्षेचा उपाय म्हणून मास्क वापरण्याचा सल्ला लोकांना दिला आहे.
केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी मंगळवारी फेसबुकवर केलेल्या एका पोस्टच्या माध्यमातून सरकारने 2 जणांच्या मृत्यूचं प्रकरण गांभीर्याने घेतलं असल्याचं सांगितलं. तसेच या दोघांचा मृत्यू निपाहमुळे झाल्याची दाट शक्यता असल्याने संपूर्ण जिल्ह्यात अलर्ट जारी केल्याचंही सांगितलं. लोकांनी चिंता करण्याचं कारण नाही असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मरण पावलेल्या व्यक्तींच्या निकटवर्तीयांवर उपचार सुरु असल्याने लोकांनी चिंता करु नये असं मुख्यमंत्री म्हणाले.
राज्याच्या आरोग्यमंत्री वीना जॉर्ज यांनी कोझिकोड जिल्ह्यात पोहोचल्या असून त्यांनी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी एक उच्च स्तरीय बैठक घेतली. यासंदर्भात आवश्यक ती पावलं तातडीने उचलली जातील असं प्रसारमाध्यमांना सांगण्यात आलं आहे. एक मृत्यू खासगी रुग्णालयात झाला आहे. मरण पावलेल्या व्यक्तीच्या मुलांना, भावाला आणि नातेवाईकांना ताप असल्याने त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी मरण पावलेल्या व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध सुरु आहे असं सांगितलं. कोझिकोड जिल्ह्यामध्ये 2018 आणि 2021 मध्येही निपाह व्हायरसमुळे लोकांचा मृत्यू झाल्याची प्रकरण समोर आली होती. दक्षिण भारतामध्ये निपाह विषाणूच्या संसर्गाचं पहिलं प्रकरण 19 मे 2018 रोजी समोर आलं होतं.
निपाह व्हायरसची लक्षणं काय?
जर एखाद्या व्यक्तीला निपाह व्हायरसची लागण झाली असेल तर त्याला खूप ताप, डोकेदुखी, श्वसनाचा त्रास, घसा खवखवणे, अॅटिपिकल न्यूमोनिया यांसारखी लक्षणं दिसतात. परिस्थिती अधिक गंभीर असल्यास, व्यक्ती 24 ते 48 तासांच्या आत एन्सेफलायटीसची शिकार होऊ शकते आणि कोमात जाऊ शकते. निपाह व्हायरसची लक्षणं 5 ते 14 दिवसात दिसू शकतात. परंतु काही प्रकरणांमध्ये हा काळ 45 दिवसांपर्यंत वाढू शकतो. इतक्या काळात आपण इतक्या लोकांना भेटती की, किती जणांना संक्रमित केलं आहे हे समजणारही नाही. काही प्रकरणांमध्ये एखाद्या व्यक्तीला अजिबात लक्षणं दिसत नाही असंही होऊ शकतं.
नेमकी काय काळजी घ्यावी?
जर तुम्हालाही आपल्याला निपाह व्हायरसची लागण झाल्याची शंका असेल तर आरटी-पीसीआर चाचणी करुन घ्या. याशिवाय पीसीआर, सीरम न्यूट्रिलाइजेशन आणि एलाइज़ा टेस्टच्या माध्यमातून व्हायरसची माहिती घेऊ शकता.