Anand Mahindra Birthday: भारतातील काही कंपन्यांनी जागतिक पातळीवर आपली छाप उमटवली आहे. यामध्ये प्रामुख्याने घेतल्या जाणाऱ्या कंपन्यांमध्ये महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचाही समावेश आहे. भारतासह जगभरात या ब्रँडला मोठी पसंती मिळते. त्यात आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी कंपनीचा कारभार घेतल्यापासून महिंद्रा अँड महिंद्रा (Mahindra & Mahindra) कंपनी एका वेगळ्या उंचीवर पोहोचली आहे. आनंद महिंद्रा यांनी भारतासह जगाला या ब्रँण्डला नवी ओळख निर्माण करुन दिली आहे. पण आनंद महिंद्रा हे सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आहे होते. याचं कारण त्यांच्या आजोबांनी आधीच हे मोठं साम्राज्य उभं केलं होतं. पण तुम्हाला महिंद्रा अँड महिंद्रा या कंपनीची स्थापना कशी झाली हे माहिती आहे का? जाणून घ्या.
जगदीश चंद्र महिंद्रा हे महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे सह-संस्थापक आहेत. त्यांना जे सी महिंद्रा नावानेही ओळखलं जातं. कैलाश चंद्र महिंद्रा आणि मलिक गुलाम मोहम्मद यांच्यासह 1945 मध्ये त्यांनी कंपनीची स्थापना केली. महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने सध्याचे चेअरमन असणाऱ्या आनंद महिंद्रा यांचे ते आजोबा आहेत.
जगदीश चंद्र महिंद्रा यांचा जन्म 1892 मध्ये पंजाब प्रांतातील लुधियानामध्ये झाला. नऊ भावांमध्ये ते सर्वात मोठे होते. ते फार लहान असताना वडिलांचं निधन झाल्याने फार कमी वयात त्यांच्या खांद्यावर कुटुंबाची जबाबदारी आली होती. त्यांचा शिक्षण बदल घडवू शकतं यावर फार विश्वास होता. त्यामुळे आपले भाऊ आणि बहीण चांगले आणि खूप शिकतील याची त्यांनी खात्री केली. त्यांनी त्यांचे भाऊ कैलाशचंद्र महिंद्र यांना शिक्षणासाठी केंब्रिज विद्यापीठात पाठवलं.
जगदीश चंद्र महिंद्रा यांनी व्हिक्टोरिया ज्युबिली टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट (VJTI) आणि भारतातील प्रमुख अभियांत्रिकी आणि तांत्रिक संस्थांपैकी एक असलेल्या बॉम्बे विद्यापीठातून पदवी प्राप्त केली. त्यांनी टाटा स्टीलसह आपल्या करिअरला सुरुवात केली. 1929 ते 1940 या काळात ते सिनिअर सेल्स मॅनेजर पदावर होते. दुसऱ्या महायुद्धात पोलाद उद्योग आणीबाणीचा विषय झाल्याने भारत सरकारने त्यांना भारताचे पहिले स्टील नियंत्रक म्हणून नियुक्त केलं.
1945 मध्ये जगदीश चंद्र महिंद्रा आणि के सी महिंद्रा यांनी मलिक गुलाम मोहम्मद यांच्याशी हातमिळवणी करत मुंबईत महिंद्रा अँड मोहम्मद स्टील कंपनी सुरु केली. पण दोनच वर्षांनंतर 1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि गुलाम मोहम्मद यांनी पाकिस्तानचे पहिले अर्थमंत्री बनण्यासाठी कंपनी सोडली. दुसरीकडे महिंद्रा बंधूंनी मुंबईत विलीस जीप तयार करण्यास सुरुवात केली. लवकरच, कंपनीचे नाव बदलून महिंद्रा अँड महिंद्रा करण्यात आले. 1951 मध्ये जगदीश चंद्र महिंद्रा यांचं ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झालं.