Muktidham Mukam Temple : अजित पवार राष्ट्रवादी पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी (Baba Siddique) यांच्या हत्येने मुंबई हादरली आहे. 12 ऑक्टोबरला मुंबईतल्या वांद्रे इथल्या आमदार झिशान सिद्ददीकी यांच्या कार्यालयाबाहेर तिघांनी गोळ्या झाडून बाबा सिद्दीकी यांची हत्या केली. यातल्या दोन हल्लेखोरांना अटक करण्यात आली असून हे दोघंही लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंधित असल्याची माहिती आहे. सलमान खानला जो मदत करणार त्यांना आम्ही संपवणार' असं बिश्नोई गँगने म्हटलं आहे. एनआयएच्या चौकशीत लॉरेन्सने त्याच्या 5 टार्गेट्सबाबत खुलासा केला होता. यामध्ये बॉलिवूड अभिनेता सलमान खानचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे.
लॉरेन्स बिश्नोईच्या रडारवर सलमान खान
एनआयएच्या तपासात लॉरेन्स बिश्नोईने सलमान खान (Salman Khan) आपल्या टार्गेटमध्ये पहिल्या क्रमांकावर असल्याचं सांगितलं होतं. काळविट हत्याप्रकरणात सलमान खानचं नाव समोर आल्यानेतर बिश्नोई त्याच्यावर नाराज आहे. अनेकवेळा लॉरेन्स बिश्नोईकडून सलमान खानला धमकी देण्यात आली आहे. सलमानच्या मुंबईतल्या गॅलेक्सी अपार्टमेंट या घराबाहेरही गोळीबारक करण्यात आला होता. केवळ माफी नाही तर मंदिरात येऊन डोकं टेक, अशी अट लॉरेन्स बिश्नोईने सलमान खानसमोर ठेवली आहे.
'मुक्तिधाम मुकाम' मंदिर
लॉरेन्स बिश्नोईने ज्या मंदिराचा उल्लेख केला आहे ते राजस्थानमधल्या बिकानेर इथलं एक प्रसिद्ध मंदिर आहे. सलमान खानने बिकानेरमध्ये असलेल्या बिश्नोई समाजाच्या मुक्तिधाम मंदिरात येऊन समाजाच्या देवासमोर डोकं ठेऊन माफी मागितली तर त्याला आपण माफ करु असं लॉरेन्स बिश्नोईने म्हटलं होतं. बिश्नोई समाजासाठी मुक्तीधाम मंदिर पवित्र मानलं जातं. त्यामुळे या मंदिराला बिश्नोई समाजाचं मंदिर असंही म्हटलं जातं. हे मंदिर बिकानेरमधल्या नोखा जिल्ह्यातील मुकाम गावी आहे. बिकानेर जिल्हा मुख्यालयापासून हे मंदिर 63 किलोमीटर दूरीवर आहे.
सलमान खानवर का आहे राग?
1998 साली 'हम साथ साथ है' या चित्रपटाचं चित्रीकरण जोधपूरमध्ये सुरु होतं. यावेळी सलमान आपल्या सहकलाकारांसह शिकारीसाठी गेला होता. यावेळी सलमानने काळविटाची शिकार केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला. यानंतर बिश्नोई समाजाने काळवीट शिकार प्रकरणी सलमानविरुद्ध गुन्हा दाखल केला. तेव्हापासून बिश्नोई समाजाचा सलमान खानवर राग आहे. बिश्नोई समाजामधील लोक निसर्गालाच देव मानतात. त्यांच्या धार्मिक मान्यतांनुसार झाडाची पानं, फुलांबरोबर प्राण्यांपर्यंत अनेक गोष्टींच्या संवर्धनासाठी ते प्रयत्न करतात. त्यातही काळवीटाला या समाजामध्ये फारच जास्त धार्मिक महत्त्व आहे.