नवी दिल्ली : 'चौकीदार चोर है' या वक्तव्याने आधीच अडचणीत असलेल्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीचा पाय अधिकच खोलात गेला आहे. चौकीदार चोर आहे हे सर्वोच्च न्यायालयानेही म्हटले आहे असे विधान त्यांनी केले होते. त्यानंतर त्यांना दिलगिरी व्यक्त करावी लागली होती. आता मोदी आडनावाचे सर्व लोक चोर असतात या त्यांच्या विधानाने वाद ओढवून घेतला आहे. या वादग्रस्त विधानावर आता राहुल गांधी पुन्हा अडचणीत सापडणार आहेत.
पाटणा उच्च न्यायालयाने २० मेला राहुल गांधी यांना हजर होण्याचे आदेश दिलेत. बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात याचिका दाखल केलीय. त्याशिवाय आरा सत्र न्यायालयातही राहुल गांधी यांच्याविरोधात याचिका दाखल झालीय. १३ एप्रिलला कर्नाटकातल्या कोल्लार इथे झालेल्या रॅलीत राहुल गांधी यांनी मोदी आडनावाचे सर्वच जण चोर असतात असं विधान केले. त्यावर पंतप्रधानांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले होते.
आता न्यायालयात हे प्रकरण गेले. या आधी चौकीदार चोर है हे वाक्य न्यायालयाच्या तोंडी घालणं राहुल यांना भोवले. बिहारमधील समस्तीपुरमध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी चौकीदार चोर आहे, अशी घोषणा दिली होती. या प्रकरणी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समस्तीपूरमध्ये प्रचारादरम्यान राहुल गांधी यांनी चौकीदार चोर आहे, अशा घोषणा दिल्या. यावेळी राजदचे नेते तेजस्वी यादवही उपस्थित होते. त्यामुळे दोघेही अडचणीत आले आहेत.