Shirdi Lok Sabha Election: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व पक्ष कामाला लागले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन अमित शहा आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक घेतली. यानंतर मनसे महायुतीमध्ये सामिल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान मनसेकडून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिर्डी लोकसभा मतदार संघाची चाचपणी करण्यात आली आहे. कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवायची यांवर अजून शिक्कामोर्तब नाही. असे असले तरी शिर्डी मतदार संघातून बाळा नांदगावकर यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.
शिर्डीतील मतदारांना बाळा नांदगावकर ओळखीचा चेहरा आहे. शिवसेनेत होते तेव्हाही आणि मनसेत असतानाही बाळा नांदगावकर शिर्डीचे संपर्क प्रमुख आहेत. गेल्या 20 वर्षांपेक्षा जास्तीचा काळ बाळा नांदगावकर शिर्डी भागात काम करत आहेत. तर महायुतीची देखील शिर्डी लोकसभा मतदारसंघात ताकद आहे
भाजपाचे शिर्डीचे आमदार महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील ते शिर्डी विधानसभेचे विद्यमान आमदार…अशी विखेंची शिर्डी लोकसभा मतदार संघावर चांगली पकड आहे.
मागच्या निवडणुकीत कोपरगावच्या भाजपाच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे अवघ्या 800 मतांनी पराभूत झाल्या होत्या. तर, स्नेहलता कोल्हे यांचा परभव करणारे आशुतोष काळे राष्ट्रवादी कॅांग्रेस पक्ष अजित पवार गटाचे आहेत. संगमनेरचे बाळासाहेब थोरात हे आमदार आहेत पण संगमनेर मध्ये अनेक ग्रामपंचायती विखेंच्या ताब्यात आहेत.
अकोले विधानसभेचे विद्यमान आमदार किरण लहानटे अजित पवार गटाचे महायुतीचे आमदार आहेत. अकोलेचे भाजपा नेते मधुकर पिचड हे भाजपात आहेत. अकोलेचे अनेक छोटे मोठे लोकप्रतिनिधी अजित पवारांसोबत आहेत. अकोलेत महायुतीला लीड मिळू शकते. श्रीरामपूर विधानसभा मतदार संघात भाजपा दोन नंबरचा पक्ष आहे. नेवासा विधानसभा मतदार संघात भाजापाचे माजी आमदार बाळासाहेब मुरकूटे यांची ब-यापैकी ताकद आहे. राहुरी विधानसभेतील 32 गावात देखील युतीची ताकद आहे.
एकंदर शिर्डी मतदार संघ महायुतीला अनुकूल आहे. असे असले तरी येथे 'काटेकी टक्कर' होवू शकते. मोदींची गेल्या वेळेस शिर्डी लोकसभा मतदार संघात सभा झाली होती. याही वेळेस मोदींची सभा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथे महायुतीला क्लिन स्विप मिळू शकतो. असे असताना बाहेरचा उमेदवार हा मुद्दा निवडणूक प्रचारात जोरदार चालू शकतो.