'बिग बॉस' शूट न करताच का परतलास? अक्षय कुमारने अखेर सोडलं मौन; म्हणाला 'सलमानने मला 40 मिनिटं...'

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) शूट न करताना बिग बॉसच्या (Big Boss) सेटवरुन परतला. सलमान खान (Salman Khan) शूटसाठी उशिरा पोहोचल्याने अक्षय कुमार आपला आगामी चित्रपट 'स्काय फोर्सचं' (Sky Force) प्रमोशन न करताच परतला.   

शिवराज यादव | Updated: Jan 21, 2025, 06:14 PM IST
'बिग बॉस' शूट न करताच का परतलास? अक्षय कुमारने अखेर सोडलं मौन; म्हणाला 'सलमानने मला 40 मिनिटं...' title=

बिग बॉसच्या 18 व्या सीझनचा (18th season of Bigg Boss) अखेरचा एपिसोड पार पडला आहे. करणवीर मेहरा (Karanveer Mehra) 18 व्या पर्वाचा विजेता ठरला आहे. मात्र बिग बॉसचा अखेरचा एपिसोड वेगळ्या कारणामुळे जास्त चर्चेत राहिला. सलमान खान (Salman Khan) सेटवर उशिरा पोहोचणं यासाठी निमित्त ठरलं. झालं असं की, अक्षय कुमार बिग बॉसमध्ये सहभागी होणं अपेक्षित होतं. एक भाग अक्षय कुमारसोबत (Akshay Kumar) शूट होणार होता. पण सलमान खानला उशीर झाल्याने अक्षय कुमार शूट न करताच निघून गेला आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या. अक्षय कुमार आणि वीर पहारिया (Veer Pahariya) आपल्या आगामी 'स्काय फोर्स' (Sky Force)चित्रपटाच्या प्रमोसनसाठी पोहोचले होते. पण अक्षय कुमार निघून गेल्याने एकट्या वीर पहारियाला सलमानसह शूट करावं लागलं. 

सलमान खानला सेटवर पोहोचण्यासाठी कित्येक तास उशीर झाला असं सांगितलं जात होतं. मात्र आता स्वत: अक्षय कुमारने दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली आहे. आपल्या आधीच काही गोष्टी ठरल्या होत्या, ज्यामुळे जावं लागलं असं अक्षय कुमारने सांगितलं. 

सलमानच्या उशिरा येण्यामुळे शो रद्द झाला का? याबद्दल विचारलं असता अक्षयने सांगितलं की, "त्याला इतका उशीर झाला नव्हता. मी पोहोचलो होतो. त्याचं काही वैयक्तिक काम असल्याने तो थोडा उशिरा आला. आणि मग आम्ही त्याबद्दल बोललो आणि त्याने मला सांगितले की तो सुमारे 35 ते 40 मिनिटे उशिरा आला. त्यानंतर मला निघून जावं लागलं. मग आम्ही त्याबद्दल बोललो आणि मी निघून गेलो, पण वीर तिथे होता, म्हणून त्याने त्याच्यासोबत शूटिंग केलं".

अक्षयला बॉलिवूडमध्ये शिस्तबद्धल आणि वक्तशीर अभिनेता म्हणून ओळखलं जातं. तर सलमानच्या अनेक माजी सहकाऱ्यांनी तो क्वचितच वेळेवर येतो असं अनेकदा सांगितलं आहे. चित्रपट निर्माते अनीस बझमी, ज्यांनी दोघांसोबत काम केले आहे, त्यांनी लेहरेन रेट्रोला एका मुलाखतीत सांगितले की, "अक्षय खूप वक्तशीर माणूस आहे. त्याच्यासोबत काम करताना आम्हाला नेहमीच काळजी वाटते, कारण जर तो म्हणाला की आम्ही सकाळी 7 वाजता काम सुरू करू, तर तो सकाळी 7 वाजता तिथे पोहोचेल. आणि आम्हाला सकाळी 6-7 वाजता उठण्याची सवय नाही. कधीकधी, आम्ही सलमान भाईसोबत खूप आराम करतो. कारण तो दुपारी 1 वाजता येतो, जेवतो पण नंतर तो दिवसाच्या शेवटपर्यंत थांबतो."

हिंदुस्तान टाईम्सच्या सूत्रानुसार, "अक्षय वेळेवर असल्याने, तो त्याच्या शूटिंगसाठी नियोजित वेळेनुसार, दुपारी 2.15 वाजता सेटवर पोहोचला. पण सलमान तोपर्यंत आला नव्हता. अक्षयने सलमानच्या येण्याची एक तास वाट पाहिली, पण त्याच्या वेळापत्रकानुसार जॉली एलएलबी 3 चे ट्रायल स्क्रीनिंग होते. अशाप्रकारे, एक तास वाट पाहिल्यानंतर, अक्षय शूटिंग न करताच परतला."

संदीप केवलानी आणि अभिषेक कपूर दिग्दर्शित, 'स्काय फोर्स' चित्रपटाची निर्मिती दिनेश विजन, ज्योती देशपांडे आणि अमर कौशिक यांनी केली आहे. 'स्काय फोर्स'' हा चित्रपट 1965 मध्ये भारत-पाकिस्तान हवाई युद्धात पाकिस्तानच्या सरगोधा एअरबेसवर भारताने केलेल्या प्रत्युत्तरात्मक हल्ल्यावर आधारित आहे. या चित्रपटात सारा अली खान आणि निमरत कौर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित होणार आहे.