भाजप उमेदवार स्मृती इराणी २०१४ ला पदवीधर, २०१९ मध्ये पदवीधर नाहीत!

भाजपच्या अमेठीच्या उमेदवार स्मृती इराणी यांनी प्रतिज्ञापत्रात केलेल्या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे. 

Updated: Apr 12, 2019, 05:46 PM IST
भाजप उमेदवार स्मृती इराणी २०१४ ला पदवीधर,  २०१९ मध्ये पदवीधर नाहीत! title=

अमेठी : भाजपच्या अमेठीच्या उमेदवार स्मृती इराणी यांनी प्रतिज्ञापत्रात केलेल्या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी अमेठी मतदारसंघातून निवडणूक लढवत असून त्यांनी निवडणूक आयोगाकडे प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. उमेदवारी अर्जाबरोबर दिलेल्या प्रतिज्ञापत्रात आपण पदवीधर नसल्याचे स्मृती इराणींनी स्पष्ट केले आहे. गेल्या निवडणुकीतही स्मृती इराणी यांनी अमेठीमधून लोकसभेची निवडणूक लढवली होती. त्यावेळी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी पदवीधर असल्याचे म्हटले होते. आता त्यांनी पदवीधर नसल्याची जाहीर केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. यावर काँग्रेसने 'क्यूंकी बहू भी कभी ग्रॅज्युएट थी' म्हणत स्मृती इराणी यांची खिल्ली उडवली आहे. 

स्मृती इराणी यांनी दिल्ली विद्यापीठातून आपण पदवी पूर्ण केली नसल्याचे स्पष्ट केले आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना इराणी यांनी १९९१ मध्ये दहावी आणि १९९३ मध्ये बारावीची परीक्षा उत्तीर्ण केल्याचे नमूद केले आहे. दिल्ली विद्यापीठाच्या ओपन लर्निंगच्या माध्यमातून तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण केला नसल्याचे इराणी यांनी म्हटले आहे. अमेठी मतदारसंघात इराणी राहूल गांधी यांच्याविरोधात निवडणूक लढवत आहेत. दरम्यान, त्यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत पदवीधर असल्याचे म्हटले होते. यावर आक्षेप घेतल्यानंतर वाद निर्माण झाला होता.

इराणी यांनी प्रतिज्ञापत्रामध्ये पदवीधारक असल्याचे म्हटले होते. यावर विरोधकांनी आक्षेप घेतला होता. त्यावरून गदारोळ उडाला होता. इराणी पदवीधारक नसून त्यांनी ही माहिती खोटी दिल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. इराणी यांनी आपली मालमत्ता ४.७१ कोटी रुपयांची असल्याचे नमूद केले आहे. इराणी यांच्याकडे १३ लाखांची गाडी आणि २१ लाखांचे दागिने आहेत. त्यांच्या विरोधात कुठलाही गुन्हा दाखल नाही. तर पती झुबिन यांच्याकडेही पाच कोटी रुपयांच्या आसपास संपत्ती असल्याचे त्यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. इमारत आणि जमीन या स्वरूपात २.९६ कोटी रुपयांची तर ठेवी आणि रोख रकमेच्या आणि अन्य स्वरूपात एक कोटी ७५ लाख रुपयांची संपत्ती असल्याचे इराणी यांनी म्हटलेय.