नवी दिल्ली : २०१९ च्या लोकसभा निवडणुकांना सुरुवात झाली आहे. भाजपाचा प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सतत विविध राज्यांत प्रचार सभा घेत आहेत. मोदींची आज जम्मू-काश्मीरमधील कठुआमध्ये प्रचार सभा पार पडली. सभेच्या सुरूवातीला मोदींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त श्रद्धांजली दिली आहे. यावेळी प्रचारसभेत बोलताना त्यांनी विविध मुद्यावरून काँग्रेसला लक्ष्य केले. पंतप्रधानांनी जम्मू आणि काश्मीरच्या मुद्द्यांवर सवाल करणाऱ्यांनाही उत्तर दिले आहे. जम्मू-काश्मीर भारताचा अविभाज्य भाग असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
कितीही शिव्या दिल्या तरी देशाचे तुकडे होऊ देणार नाही अशा शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी फारुख अब्दुल्ला आणि मेहबूबा मुफ्ती यांच्यासह काँग्रेसला ठणकावले आहे. जम्मू काश्मीरच्या कठुआमध्ये पंतप्रधानांनी विविध मुद्यावरून काँग्रेसला लक्ष्य केले. न्याय योजनेच्या नावाखाली काँग्रेस देशवासियांची दिशाभूल करत असल्याचा आरोपही मोदींनी केलाय. काँग्रेस आणि महाआघाडीच्या नेत्यांच्या राष्ट्रभक्तीचा बुरखा फाटल्याचा घणाघातही मोदींनी केला आहे.
मोदींनी जम्मू-काश्मीरमधील काश्मीर पंडितांच्या पलायनचाही मुद्दा उपस्थित केला. काँग्रेसच्या धोरणांमुळेच काश्मीरी पंडित बंधु-भगिणींना आपले घर सोडावे लागल्याचा आरोपही मोदींनी काँग्रेसवर केला आहे. काँग्रेसला त्यांच्या मतांबाबत इतकी काळजी होती की, काश्मीरी पंडितांवर होणाऱ्या अत्याचारांकडे त्यांनी दुर्लक्ष केले असल्याची टीकाही काँग्रेसवर करण्यात आली.