नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी आज भाजपाची २५० हून अधिक उमेदवारांची यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशातील ३५, बिहारमधील सर्व १७, महाराष्ट्रातील २१, उडीसा, झारखंड, छत्तीसगडमधील १५ कर्नाटक आणि जम्मू काश्मीरमधील १२, राजस्थान, बंगामधून जवळपास २७, केरळ, तामिळनाडू, आसाम, त्रिपुरा, तेलंगणा, अरुणाचल प्रदेशच्या सर्व, उत्तराखंडच्या सर्व पाच जागांवर उमेदवारांच्या नावांची घोषणा होऊ शकते.
गाझियाबादमधून जनरल व्ही. के. सिंह, नोएडातून महेश शर्मा, मथुरेतून हेमामालिनी यांची नावं निश्चित मानली जातायत. आसनसोलमधून बाबुल सुप्रियो, तृणमूलमधून आलेले सौमित्र खान आणि अनुपम हाजरा यांची नावंही निश्चित मानली जातायत. दार्जिलिंगच्या एस एस अहलुवालियांच्या उमेदवारीचा निर्णय पक्षश्रेष्ठी करतील.
दरम्यान, छत्तीसगडमध्ये गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीच्या धक्कादायक निकालानंतर इथे एकाही विद्यामान खासदाराला तिकिट द्यायचं नाही, असा निर्णय भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. १५ वर्षं सत्तेत असलेले भाजप सरकार सत्ता टिकवणार, अशी खात्री असताना पक्षाने या राज्यात सर्वाधिक मार खाल्ला होता. विधानसभेच्या ६८ जागांपैंकी केवळ १५ जागा पक्षाला जिंकता आल्या.