Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने पहिल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. आता भाजप (BJP) मोठी खेळी करण्याच्या तयारीत आहे. पश्मिम बंगालमध्ये भाजप टीम इंडियातल्या (Team India) दिग्गज खेळाडूला मैदानात उतरवण्याची शक्यता आहे. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज आणि आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत दमदार कामगिरी करणाऱ्या मोहम्मद शमीला (Mohammad Shami) पश्चिम बंगालमधून (Wes Bengal) निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यावर भाजप विचार करत आहे. रणजी ट्रॉफीत बंगालकडून खेळताना शमीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर छाप उमटवली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपने याआधीही मोहम्मद शमीशी संपर्क साधला होता. पण अंतिम निर्णय शमीचा असणार आहे, शमी सध्या पायाच्या शस्त्रक्रियेनंतर ब्रेकवर आहे.
बशीरहाटमधून निवडणूक रिंगणात
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मोहम्मद शमीला आगामी लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमधून निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता. पश्चिम बंगालमधील अल्पसंख्याक जागांवर विजय मिळवण्यासाठी भाजप शमीला उमेदवारी देऊ शकतो. पश्चिम बंगालमधील बशीरहाट (Bashirhat) लोकसभा मतदारसंघातून शमीला उमेदवारी देण्याचा भाजपाचा विचार आहे. बशीरहाट हा मतदारसंघ संवेदनशील आहे. ज्या संदेशखालीत महिलांवरील अत्याचाराच्या घटना समोर आल्या होत्या तो भाग बशीरहाट मतदारसंघातच येतो. या मतदारसंघात अल्पसंख्याक मतदारांची संख्या सर्वाधिक आहे.
राजकीय तज्ज्ञांच्या मते मोहम्मद शमीला निवडणुकीच्या मैदानात उतरवण्याचा निर्णय हा पीएम मोदी यांचा मास्टरस्ट्रोक असेल. भारतीय क्रिकेटच्या ट्रेंडिंग हिरोंपैकी मोहम्मद शमी एक आहे.
विश्वचषक स्पर्धेत शमीचा कारनामा
2023 मध्ये झालेल्या आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत मोहम्मद शमीने दमदार कामगिरी केलीहोती. 33 वर्षांच्या शमीने 7 सामन्यात 24 विकेट घेत दाणादाण उडवून दिली होती. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात शमीने 57 धावांत 7 विकेट घेतल्या होत्या. या विश्वचषक स्पर्धेत शमीने तीन वेळा 5 विकेट घेण्याची कामगिरी केली होती. नुकताच शमीला अर्जुन पुरस्कारही प्रदान करण्यात आला.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मोहम्मद शमीची भेट घेतली होती. यावेी त्यांनी शमीच्या अमरोहा गावात एक क्रिकेट स्टेडिअम उभारण्याची घोषणा केली होती. टीम इंडियाला एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पराभवाला सामोरं जावं लागल्यानंतर पीएम मोदी यांनी टीम इंडियातल्या खेळाडूंचं सांत्वन केलं होतं. टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममध्ये येऊन त्यांनी सर्व खेळाडूंशी हस्तालोंदन केलं. तर मोहम्मद शमीची गळाभेट घेतली. हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता.