INDIA Bloc Maharally Updates: दिल्लीतील रामलीला मैदानामध्ये विरोधी पक्षांनी एकत्र येत 'इंडिया' आघाडीच्या माध्यमातून शक्तीप्रदर्शन केलं. 'लोकशाही वाचवा रॅली'च्या माध्यमातून कोण्या एका व्यक्तीला वाचवण्यासाठी नाही तर संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत, असं काँग्रेसने म्हटलं आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्यसभा खासदार शरद पवारही या रॅलीमध्ये उपस्थित आहेत. काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, काँग्रेसचे अध्यक्ष मलिक्कार्जून खरगे तसेच खासदार राहुल गांधीही रॅलीमध्ये उपस्थित असून राहुल गांधींनी आपल्या भाषणातून मोदी सरकावर निशाणा साधला आहे.
सध्या देशात सुरु असलेल्या इंडियन प्रिमिअर लीगचा संदर्भ देत राहुल गांधींनी केंद्रात सत्तेत असलेलं मोदी सरकार मॅच फिक्सिंग करुन जिंकण्याचा प्रयत्न करत असल्याचा टोला लगावला. "आपल्या समोर लोकसभेच्या निवडणुका आहेत. या सामन्याचे पंच मोदीजींनी निवडले आहेत. आमच्या 2 खेळाडूंना अटक करुन तुरुंगात टाकलं आहे. या निवडणुकीमध्ये मोदीजी मॅच फिक्सिंग करण्याचा प्रयत्न करत आहेत," असं राहुल गांधी म्हणाले. पुढे बोलताना भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीला 400 काय 180 जागांहून अधिक जागाही मिळवता येणार नाही असंही राहुल गांधी म्हणाले. "त्यांनी (मोदींनी) 400 पारची घोषणा दिली आहे. मात्र ईव्हीएम, सोशल मीडिया आणि अशी मॅच फिक्सिंग केली नाही तर भाजपाला 180 हून अधिक जागा जिंकता येणार नाहीत," असा दावा राहुल गांधींनी आपल्या भाषणात केला.
"मॅच फिक्सिंग करुन भाजपा निवडणूक जिंकली आणि त्यांनी आपलं संविधान बदललं तर या देशात आग लागेल," असंही राहुल गांधी म्हणाले. "यंदाची निवडणूक ही केवळ मतदानाची निवडणूक नाही तर संविधान वाचवण्यासाठीची निवडणूक आहे," असं राहुल गांधींनी नमूद केलं. "काँग्रेस पक्षाची सर्व खाती गोठवण्यात आली आहेत. नेत्यांना पैसे देऊन धमकावलं जात आहे. सरकारं पाडली जात आहेत. नेत्यांना तुरुंगात टाकलं जात आहे. ही मॅच फिक्सिंग केवळ नरेंद्र मोदी करत नसून मोदी आणि काही 3 ते 4 अब्जाधीश एकत्र येऊन हे करत आहेत, हेच सत्य आहे," अस म्हणत राहुल गांधींनी केंद्र सरकावर टीका केली.
"Forget about 400, BJP won't be able to win even 180"
Rahul Gandhi ji pic.twitter.com/OdBIMaiqaA
— Spirit of Congress (@SpiritOfCongres) March 31, 2024
विरोधकांच्या या रॅलीमध्ये भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेले झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची पत्नी कल्पना सोरेन, अरविंद केजरीवाल यांची पत्नी सुनीता केजरीवाल, समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव, राष्ट्रीय जनता दलचे नेते तेजस्वी यादव, तृणमूल काँग्रेसचे नेत डेरेक ओ ब्रेयन, डाव्या पक्षांचे नेते सीताराम येचुरींबरोबरच अनेक नेते उपस्थित होते.