Samruddhi Mahamarg News Marathi: हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या अखेरच्या टप्प्याचे बांधकाम पूर्ण झाले आहे. समृद्धी महामार्गाचे उद्घाटन फेब्रुवारीच्या अखेरीस होण्याची शक्यता आहे. त्यामुळं मुंबई ते नागपूर प्रवासाचा कालावधी 16 तासांवरुन फक्त 8 तासांत पूर्ण होणार आहे. समृद्धी महामार्ग हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रिम प्रोजेक्ट आहे.
701 किलोमीटर लांबीचा हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग सध्या नागपूरपासून इगतपुरीपर्यंत (625 किलोमीटर) कार्यान्वित आहे. मात्र, इगतपुरी ते मुंबईदरम्यानचा 76 किलोमीटरचा शेवटचा टप्पाही आता पूर्ण झाला आहे. फेब्रुवरीमध्येच या महामार्गाच्या उद्घाटनाची शक्यता आहे.
समृद्धी महामार्गाच्या पूर्णत्वामुळे मुंबई ते नागपूर हे अंतर आता 16 तासांऐवजी केवळ 8 तासांत कापता येईल. तसंच, महामार्गावरील वाढत्या अपघातांकरता वाढीव उपाययोजनादेखील करण्यात आल्या आहेत. त्यामुळं आता समृद्धीवरील प्रवास अधिक सोप्पा आणि सुकर होणार आहे.
- हा 6 लेनचा, 120 मीटर रुंदीचा आणि 701 किलोमीटर लांब महामार्ग देशातील सर्वात अत्याधुनिक एक्सप्रेसवे आहे, जो 150 किमी प्रतितास गतीने प्रवासासाठी डिझाइन करण्यात आला आहे.
- महामार्गावर 65 फ्लायओव्हर, 24 इंटरचेंज, 6 बोगदे आणि अनेक वाहन तसेच पादचारी अंडरपास आहेत.
- इगतपुरी ते मुंबईदरम्यान कसारा जवळ 8 किलोमीटर लांब जुळ्या बोगद्यांपैकी एक बनवण्यात आला आहे, जो अत्याधुनिक जर्मन तंत्रज्ञानावर आधारित फुल वॉटर मिस्ट सिस्टमने सुसज्ज आहे.
- वन्यजीवांच्या सुरक्षिततेसाठी 80 हून अधिक संरचना उभारण्यात आल्या आहेत. महामार्गाजवळ 18 नवीन स्मार्ट टाऊन्स उभारले जाणार आहेत, जिथे स्थानिक वैशिष्ट्यांवर आधारित उद्योगांची स्थापना केली जाईल.
- 67,000 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या या महामार्गामुळे राज्यातील 10 जिल्ह्यांना थेट आणि 14 जिल्ह्यांना अप्रत्यक्ष कनेक्टिव्हिटी मिळाली आहे. यामुळे प्रचंड सामाजिक आणि आर्थिक विकासाला चालना मिळेल.
महामार्गाच्या लाभांमुळे केंद्र आणि राज्य सरकारचा खास प्रकल्प
या महामार्गाच्या उभारणीमुळे वेळ आणि इंधनाची बचत होणार आहे, तसेच औद्योगिक मालवाहतुकीचा खर्च कमी होईल. मागील दोन वर्षांत या महामार्गावर 1.52 कोटी वाहनांनी प्रवास केला असून 1,100 कोटी रुपये टोलमधून जमा झाले आहेत.