...तर 'लाडक्या बहिणीं'कडून दंडासहीत रक्कम वसूल करण्यात येईल; भुजबळांचं मोठं विधान

Chhagan Bhujbal On Ladki Bahin Yojana: महायुतीच्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेचा चांगलाच फायदा झाल्याचं विधानसभेला दिसून आलं. मात्र आता या योजनेचा आढावा घेतला जात असतानाच भुजबळांचं हे विधान समोर आलं आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jan 13, 2025, 08:54 AM IST
...तर 'लाडक्या बहिणीं'कडून दंडासहीत रक्कम वसूल करण्यात येईल; भुजबळांचं मोठं विधान title=
येवल्यात बोलताना भुजबळांचं विधान

Chhagan Bhujbal On Ladki Bahin Yojana: राज्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीसाठी गेम चेंजर ठरलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधील त्रुटी दूर करण्यासंदर्भात हलचालींना सुरुवात झाली आहे. या योजनेतील नियम डावलून लाभ मिळवलेल्या महिलांच्या खात्यातून रक्कम काढून घेतल्याच्या बातम्या समोर आल्यानंतर आता माजी मंत्री आणि येवल्याचे आमदार छगन भुजबळ यांनी सूचक विधान केलं आहे. यापूर्वी झालं गेलं ते विसरुन गेलं पाहिजे. मात्र यानंतरही नियमांना बगल देऊन कोणी लाभ घेत असेल तर काय करता येईल यासंदर्भात भुजबळांनी येवल्यामध्ये पत्रकारांशी बोलताना मत व्यक्त केलं आहे. 

भुजबळ नेमकं काय म्हणाले?

येवल्यामध्ये रविवारी पत्रकारांशी संवाद साधताना भुजबळांना लाडकी बहीण योजनेबद्दल प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना भुजबळांनी, "आधी मला जे कळलं होतं तेव्हा नियम असा काहीतरी होता की, घरातील दोन महिलांना देताना त्यांची मोटरगाडी नसावी, दुचाकी नसावी, उत्पन्नासंदर्भात नियम होते. गरीब लोकांना देण्यात यावं असा उद्देश होता. पण लोकांनी सरसकट फॉर्म भरल्याने त्यांनी घेतला फायदा," असं म्हटलं.

पुढे बोलताना, "आता माझं म्हणणं असं आहे की, एक अपिल केलं पाहिजे लोकांना. जे या नियमांमध्ये बसत नाहीत त्यांनी स्वत:हून आपली नावं काढा म्हणून सांगायला पाहिजे. जे पैसे दिले गेले ते परत मागण्यात काहीही अर्थ नाही. ते परत मागण्यात येऊ नयेत. या पुढे लोकांना सांगावं या नियमांमध्ये न बसणाऱ्यांनी स्वत: नावं काढून घ्यावीत. मात्र त्यानंतरही नावं नाही काढली तर मात्र त्यांच्याकडून दंडासहीत वसुली करण्यात येईल," असं भुजबळ म्हणाले. "मागचं जे झालं ते आपल्या लाडक्या बहिणींना अर्पण करुन टाकलं पाहिजे," असंही भुजबळ यांनी म्हटलं आहे.

माझी पतंग कोणी कापणार नाही

"आता अनेकांच्या पतंगी तर कापल्या आहेत. आता आपल्या सहकाऱ्यांसोबत पतंग उडवू. माझी पतंग कोणी कापली नाही. मी येवला मतदारसंघाचा आमदार आहे आणि तोही पाचव्यांदा आहे. माझा जन्म येवल्यातील नाही, माझे कुटुंब येवल्यातील नाहीत. तरीही मतदारसंघातील जनतेने मला मागील 20 वर्षे आणि पुढील पाच वर्षे आमदारकी बहाल केली आहे. माझी पतंग कोणीही कापणार नाही," असंही भुजबळ यावेळेस म्हणाले.

नक्की वाचा >> नाशिक: सळईच्या ट्रकमध्ये घुसली पिकअप, भीषण अपघातात 6 ठार! अपघातापूर्वीचं Video Status समोर

त्यांना पोलिसांच्या ताब्यात द्या

नायलॉन मांजा विक्रीबद्दल बोलताना छगन भुजबळांनी, "माझी महाराष्ट्रातील जनतेला विनंती आहे की, उत्सव आनंदात, उत्साहात साजरा झाला पाहिजे पण उत्सव हे दुसऱ्याला दुःख देण्यासाठी नसतात म्हणूनच नायलॉन मांजा वापरणाऱ्यांना व विक्रेत्यांना थांबवायला पाहिजे. अशा लोकांना पोलिसांच्या ताब्यात द्या," असं म्हटलं आहे. 

माझ्यासाठी विषय संपला

मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलेल्या टीकेवरुन भुजबळांना पुन्हा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर भुजबळांनी, "माझ्यासाठी तो विषय संपला आहे. माझ्याविरुध्द कोणी काही बोलले नाही तर मी ही कोणाविषयी बोलणार नाही विषय संपला! सर्वांना शुभेच्छा," असं उत्तर दिलं.