सोमवार 13 रोजी पौष पौर्णिमा निमित्त जेजुरीत खंडोबा देवाची यात्रा भरते. या यत्रेतील खास आकर्षक म्हणजे बंगाली पटांगणात पारंपरिक पद्धतीने भरला जाणारा गाढवांचा बाजार. पुरातन काळापासून गाठवांचा बाजार भरतो. डोंगरदऱ्यांमध्ये तसेच अडचणीच्या ठिकाणी अवजड सामान वाहून गाढवांची गरज लागायची आणि आजही लागते, या उद्देशाने हा बाजार भरतो.
गाढवाचं वय हे दातावरुन ठरवलं जातं. दोन दात असलेल्या गाढवांना 'दुवान' तर चार दात असलेल्या पशूला 'चौवान' म्हटलं जातं. तर ज्याला दात आलेले नाहीत त्याला अक्कर असं म्हटलं जातं. दातांवरुन गाढवांची किंमत ठरली जाते. राज्याच्या विविध भागातून वैदू, पैकोडी, कोल्हाटी, कुंभार, माती वडार, मदारी, डोंबारी, गारुडी आदी समाजबांधव गाढव खरेदीसाठी जेजुरीत मुक्कामी आले आहेत.
या बाजारात काठेवाड पशूची किंमत 50 ते 70 हजार रुपये तर महाराष्ट्रातील गावठी पशूची किंमत 20 ते 35 हजार रुपये मिळत आहे. या बाजारात नर आणि मादी पशू विक्रीसाठी येतात. नर पशूंचा वापर ओझी, अवजड सामान वाहण्यासाठी केला जातो. यांचा वापर वीटभट्टी, बांधकाम व शेतीच्या कामासाठी केला जातो. तर मादी पशूचा वापर हा औषधी दूध देणारी म्हणून केला जातो. या दुधाचा भाव साडेतीन आणि चार हजार रुपये प्रती लीटर आहे.