PUBG Killed Mother : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ इथे धक्कादायक घटना उघडकीस आली होती. 16 वर्षाच्या मुलाला PUBG गेम खेळण्यापासून रोखल्याने त्याने आईची गोळ्या झाडून हत्या केली. या मुलाला गेम खेळण्याचे व्यसन लागले होतं. याप्रकरणी पोलिसांनी मुलाला अटक केली असून पोलीस तपासात मुलाने दिलेल्या उत्तराने पोलीसही हैराण झाले.
मुलाला PUBG खेळण्याचे व्यसन होते आणि त्याची आई त्याला ऑनलाइन गेम खेळण्यापासून रोखत असे. रागाच्या भरात अल्पवयीन मुलाने वडिलांच्या परवाना असलेल्या पिस्तुलाने आईच्या डोक्यात गोळी झाडली. वडील भारतीय सैन्यात असून पश्चिम बंगालमध्ये तैनात आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळी झाडल्यानंतर त्याची आई कित्येक तास जिवंत होती. गोळी झाडल्यानंतर तो दुसऱ्या खोलीत जाऊन पुन्हा खेळत बसला. त्यानंतर अनेकवेळा तो आईच्या खोलीचा दरवाजा उघडून आई मेली की नाही हे तपासून पहात होता.
अंगाचा थरकाप उडवणारी जबाब
चौकशीदरम्यान अल्पवयीन मुलाने दिलेला जबाब अंगाचा थरकाप उडवणारा होता. 'गोळी झाडल्यानंतर आई रक्ताच्या थारोळ्यात पडली त्यानंतर ती कित्येक तास जिवंत होती, आई मेली आहे की नाही हे तपासण्यासाठी मी पुन्हा पुन्हा दरवाजा उघडत होतो. सकाळी तपासायला गेलो, तरीही आई जिवंत होती. काही तासांनंतर तिचा मृत्यू झाला' पोलिसांच्या म्हणण्यानुसार, योग्य वेळी घटनेची माहिती मिळाली असती तर कदाचित महिलेचा जीव वाचू शकला असता.
शनिवारी 8 ते 9 वाजेपर्यंत आईने मला खूप मारहाण केली. मग ती झोपायला गेली. यानंतर मी कपाटातून माझ्या वडिलांचे पिस्तूल काढले आणि आई झोपली असताना तिच्यावर गोळ्या झाडल्या.
'घरात मारहाण होत होती'
'माझी चूक नसतानाही माझ्यावर आरोप व्हायचा. एकदा तो घर सोडून निघूनही गेला होता. आई म्हणायची तुला कापून फेकून देईल, विष देईन. छोटया छोटया गोष्टींवर टोमणे मारायची. बाहेर खेळायला गेल्यावरही तिला राग यायचा, असं या मुलाने सांगितलं.
मुलाने गेल्या शनिवारी आपल्या आईवर गोळ्या झाडल्या होत्या आणि तिचा मृतदेह दोन दिवस खोलीत कोंडून ठेवला होता. घटनेच्या वेळी मुलाची 9 वर्षांची बहीण देखील घरी होती, परंतु मुलाने तिला धमकावले आणि तिला दुसर्या खोलीत बंद केलं. मृतदेहातून येणारा दुर्गंध लपवण्यासाठी त्याने रूम फ्रेशनरचा वापर केला.
उष्णतेमुळे दुर्गंधी पसरत होती, दुर्गंधीमुळे शेजाऱ्यांना ही गोष्ट कळेल अशी भीती मुलाला वाटत होती. पण शेजाऱ्यांना संशय आला आणि त्यांनी पश्चिम बंगालमध्ये तैनात असलेल्या त्याच्या वडिलांना याबाबत माहिती दिली.
वडिलांना आला मुलावर संशय
मुलाचे हे वागणं योग्य नाही हे वडिलांच्या आधीच लक्षात आलं होतं, तो आईचं काही तरी बरं वाईट करेल याची सतत काळजी वाटत असल्याचं वडिलांनी सांगितलं. यामुळे मला तात्काळ लखनौला यायचं होतं. पण रजा मिळत नव्हती. घरात वीज बिलाची नोटीस आली आणि कनेक्शन तोडल्याची चर्चा होती, त्याबद्दल पत्नी चांगलीच नाराज होती.
वडिलांनी रविवारी फोन केला तेव्हा मुलाने उचलले आणि सांगितले की आई बिल भरण्यासाठी गेली आहे, त्यानंतर पुन्हा काही वेळावे फोन केला तेव्हा त्याने सांगितलं ती शेजारच्यांकडे गेली आहे. त्यामुळे संशय आल्याचं वडिलांनी सांगितलं.