Cyber Crime: सायबर क्राइमच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. सायबर चोरटे कधी आणि कोणत्या प्रकारे तुम्हाला गंडा घालू शकतात याचा काही नेम नाही. खासगी कंपनीत काम करणाऱ्या एका सिनीअर एक्झिक्युटिव्हची लाखो रुपयांची फसवणूक झाली आहे. सुरुवातीला त्याला 100 रुपयांचे लालच दाखवण्यात आले. त्यानंतर आरोपींच्या बोलण्यात येऊन त्याने तब्बल 12 लाख गमावले आहेत.
वडोदरा येथे राहणारे प्रकाश सावंत यांनी सायबर पोलिसांकडे एक तक्रार दाखल केली आहे. त्यांनी तक्रारीत म्हटलं आहे की, त्यांच्यासोबत लाखो रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मार्च महिन्यात सावंत यांना व्हॉट्सअॅपवर महिलेचा एक मेसेज आला ज्यात महिलेने तिचे नाव दिव्या असं म्हटलं होतं.
दिव्याने सूरज सावंत यांना एक पार्ट टाइम जॉबची ऑफर दिली. त्यात तिने त्यांना सोशल मीडिया इन्फ्लुअंसर म्हणून काम करावे लागेल, असं म्हटलं होतं. यातून तुम्ही चांगली कमाई करु शकता, असंही तिने म्हटलं होतं. आरोपीने म्हटलं होतं की तुम्ही इन्स्टाग्रामवर सिलिब्रिटींच्या पोस्टवर लाइक आणि अकाउंटला सब्सक्राइब करावे लागेल. त्यासाठी तुम्हाला टास्क देण्यात येईल.
दिव्याने सूरज यांना म्हटलं होतं की, एका टास्कमध्ये त्यांना दोन लाइक करावे लागतील. त्याबदल्यात त्यांना 200 रुपये दिले जातील. म्हणजेच एक लाइक केल्यानंतर 100 रुपये पेमेंट असेल. त्याचबरोबर, तुम्ही दररोज 1 हजारांपासून ते 15 हजारांपर्यंत कमाई करु शकता, असं लालचही त्यांना देण्यात आले.
दिव्याने सूरज यांना एक इन्स्टाग्राम लिंक शेअर केली त्याचबरोबर त्यांना फॉलो करायला सांगितले व काम झाल्यावर स्क्रीनशॉट पाठवायला सांगितले आणि काम पूर्ण झाल्यावर त्याचे पैसे दिले जातील. त्यानंतर दिव्याने त्यांना एका ग्रुपमध्ये अॅड केले. दिव्याने सावंत यांचा विश्वास जिंकल्यानंतर पहिले 200 रुपये शेअर केले. त्यानंतर सावंत यांना तिच्यावर थोडा विश्वास बसल्यावर त्यांचा आणखी एक महिलेसोबत संपर्क झाला. त्या महिलेने तिचे नाव लकी असं सांगितलं व त्याला एका ऑनलाइन ग्रुपमध्ये अॅड केले.
सावंत यांना अॅड केलेल्या ग्रुपमध्ये त्यांना दिवसाला 25 टास्क मिळत होते. त्यानंतर त्याला युट्यूब व्हिडिओ लाइक करण्यास सांगितले. त्यानंतर सावंत यांच्या पत्नीच्या अकाउंटमध्ये 500 रुपये जमा करण्यात आले. त्यानंतर सावंत यांना जास्त पैशांचे लालच दाखवून एका प्रीपेड प्लानबद्दल सांगण्यात आले. त्यात त्यांना काही पैसे डिपोझिट करण्यास सांगण्यात आले. सावंत यांनी सुरुवातीला 1000 रुपये भरले त्यानंतर त्यांना 1300 रुपये परत मिळाले. त्यानंतर त्यांनी 10 हजार रुपये दिल्यानंतर 12350 रुपयांचा परतावा मिळाला. सावंत यांचा विश्वास बसल्यानंतर त्यांनी 11.27 लाख रुपयांचे पेमेंट केले.
11.27 लाख रुपये ट्रान्सफर केल्यानंतर सावंत यांच्याकडून आणखी 11.27 लाख रुपये मागण्यात आले. आरोपींनी म्हटलं की 45 लाख मिळवण्यासाठी आणखी पैसे पाठवावे लागतील मात्र, सावंत यांनी त्यास नकार दिला. पण त्यानंतर आरोपींचा संपर्कच होत नव्हता. त्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली आहे.