हैदराबाद : पैशाच्या मोहापाई कोण काय करेल हे सांगता नाही येत. एका महाभाग नवऱ्याने चक्क आपल्या बायकोलाच जिवंत असताना कागदोपत्री मारले. इतकेच नव्हे तर, शेजाऱ्याच्या बायकोला आपल्या बायकोच्या नावाने कब्रस्तानमध्येही धाडले.. मात्र, विमा कंपनीच्या चानाक्ष अधिकाऱ्यांच्या नजरेत हा प्रकार आला आणि या महाभाग नवऱ्याच्या कृत्याचा भांडाफोड झाला. सध्या हा नवरोबा तुरूंगाची हवा खात आहे.
घटना आहे हैदराबाद शहरातील. आपल्या बायकोच्या नावे असलेला विमा मिळावा यासाठी सईद आलम नावाच्या व्यक्तीने बनाव रचला. त्यासाठी त्याने रूग्णालयाच्या कागदपत्रांमध्येही छेडछाड केली. या कागदपत्रांच्या अधारे त्याने आपली बायको मृत झाल्याचे विमा कंपनीला कळवले. या प्रकरणाबाबत माहिती देताना बंजारा हिल्स पोलीस स्टेशनचे पोलीस इन्स्पेक्टर, के श्रीनिवास यांनी सांगितले की, नाजिया शकीलच्या याच्यावर पुरानी हवेली येथील प्रिंसेस दुरू शेहवर हॉस्पिटलमधील कागदपत्रांमध्ये छेडछाडीसोबतच ग्रेटर हैदराबाद येथील म्यूनिसिपल कॉर्पोरेशन (जीएसएमसी) येथून मृत्यूचे प्रमाणपत्र मिळवल्याचाही आरोप आहे. हे प्रमाणपत्र मिळविण्यापूर्वी त्याने कब्रिस्तानमधील जमीनीच्या रेकॉर्डमध्येही छेडछाड केल्याचा आरोप आहे.
दरम्यान, विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, नाजिया शकील आणि तिचा पती सईद आलम यांनी 2012मध्ये विमा पॉलिसी खरेदी केली होती. पॉलिसीची रक्कम एक कोटी इतकी होती तसेच, त्यासाठी ते प्रत्येक वर्षी 11,000 रूपयांचा प्रीमियही भरत होते.
दरम्यान, 29 सप्टेंबरला बंजारा हिल्स रोड 10 येथील आयसीआयसीआय प्रेडीन्शियल अधिकाऱ्यांनी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. या तक्रारीत म्हटले होते की, नाजिया शकीलच्या नावे एक क्लेम अप्लिकेशन केरण्यात आले आहे. ज्यात कागदपत्रांमध्ये छेडछाड करण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. श्रीनिवास यांनी सांगितले की, 'क्लेम अप्लिकेशनमध्ये सईदने ाजिया शकील हिच्या मृत्यूचा दावा केला होता. त्यासाठी दुरू शेहवर हॉस्पिटलचे सर्टिफिकेट, कब्रिस्तान सर्टिफिकेट आणि जीएसएमसीकडून मिळालेले मृत्यू प्रमाणपत्र जोडण्यात आले होते. मात्र, विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी जेव्हा चौकशी केली तेव्हा नाजिया जिवंत असल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे या प्रकरणाचा भांडाफोड झाला.'
पोलिसांनी आलेल्या तक्रारीचा तपास केला तेव्हा धक्कादायक गोष्ट पुढे आली. यात दाबीरपुरा परिसरातील आरोपीच्या शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तिच्या बायकोचा मृत्यू झाला होता. या मृत महिलेचे नाव मल्लिका बेगम असे होते. तसेच, तिचा मृत्यू दुरू शहवर हॉस्पिटलमध्ये झाला होता. आरोपीने मल्लिकाची सर्व कागदपत्रे नाव बदलून नाजियाच्या नावे केली. हा प्रकार लक्षात येताच पोलिसांनी आरोपीच्या घरी धाड टाकली. मात्र, त्यापूर्वीच ते पसार झाले होते. अखेर एका नातेवाईकाच्या घरातून पोलिसांनी आरोपी पत्नीला ताब्यात घेतले. पोलिसांनी केलेल्या चौकशीत नाजियाने सर्व आरोप मान्य केले असून, पतीबाबत माहितीही दिली आहे. पोलीस सध्या आरोपी पतीच्या शोधात आहेत.